अक्षय शिंदे, साम टीव्ही
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर धमकी देणे, अश्लील आरोप आणि बदनामीकारक मजकूर तसेच फोटो-व्हिडिओ प्रसारित केल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील सक्रिय महिला आंदोलक ललिता तारक यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियावर आपल्याविरोधात अश्लील शिवीगाळ, बदनामीकारक मजकूर आणि धमकीच्या पोस्ट करण्यात आल्या. तसेच, एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील फोटो आणि व्हिडीओ तयार करून ते प्रसारित केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तक्रारीसोबत संबंधित सोशल मीडिया अकाऊंटचे स्क्रीनशॉट आणि फोन कॉलचे पुरावे पोलिसांकडे देण्यात आल्याचे वृत्त आहे.
या प्रकरणात 10 ते 11 जणांविरोधात, त्यापैकी पाच जणांसह काही अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास अंबड पोलीस करत आहेत. दरम्यान, ललिता तारक यांच्या तक्रारीबाबत मनोज जरांगे पाटील यांना विचारले असता, त्यांना त्रास झाला, त्यांनी अर्ज केला. त्यावर मी काही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
विभागीय आयुक्तांकडे अपील करण्यासंदर्भातील प्रश्नावरही जरांगे यांनी न्यायालयीन प्रक्रियेचा संदर्भ देत प्रकरण न्यायालयात असल्याचे सांगितले. तसेच, काही सहकाऱ्यांना ईडीची नोटीस आल्याच्या चर्चेबाबत बोलताना जरांगे यांनी कशाची नोटीस आहे, ईडीची येऊ द्या, सीबीआयची येऊ द्या, अशी प्रतिक्रिया दिली. आंदोलन मोडीत काढण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबाबतही जरांगे यांनी भूमिका मांडली. लोकशाही धोक्यात येत असेल तर अशा व्यक्तींना पदावर का ठेवले जाते, असा सवाल त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर ललिता तारक यांच्या तक्रारीनंतर दाखल झालेला गुन्हा, सोशल मीडिया पोस्ट आणि जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया यामुळे मराठा आरक्षण आंदोलनातील अंतर्गत मतभेदांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.