अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय असलेल्या ललिता तारख यांची अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. सोशल मीडियावर अश्लील शिवीगाळ करणे, AI तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील फोटो व व्हिडिओद्वारे बदनामी करणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी या तक्रारीत केला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आरोप करणाऱ्यांनी २०२३ पासून माझ्यासह सर्वांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणीही ललिता तारख यांनी केली आहे.
नेमके प्रकरण काय?
मराठा आरक्षण आंदोलनाबाबत प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडल्यानंतर मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असून, AI चा गैरवापर करून सोशल मीडियावर अश्लील फोटो व व्हिडिओद्वारे प्रचंड बदनामी केली जात असल्याचा गंभीर आरोप ललिता तारख यांनी केला आहे. याप्रकरणी ललिता शामसुंदर तारख यांनी अंबड पोलीस ठाण्यात लेखी निवेदन दिले असून दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची आणि कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
ललिता तारख या मूळच्या अंतरवाली सराटी येथील रहिवासी असून सध्या अंबड येथील मोरया रेसिडेन्सी भागात राहतात. त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्या आणि त्यांचे कुटुंब मागील तीन वर्षांपासून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनात सक्रियपणे सहभागी होते. हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करून १० महिने उलटले तरी प्रमाणपत्र मिळाले नाही. आरक्षण न मिळाल्याने आणि आंदोलनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी २६ सप्टेंबर रोजी प्रसारमाध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त केली होती.
धमक्या आणि AI च्या माध्यमातून बदनामी:
प्रसारमाध्यमांमध्ये वक्तव्य केल्यानंतर मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून त्यांना, त्यांच्या पतीला आणि मुलाला फोनवरून अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तसेच, सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात अत्यंत गलिच्छ भाषेत टीका केली जात असून, AI तंत्रज्ञानाचा गैरवापर करून त्यांचा चेहरा अश्लील चित्रांवर लावून बदनामीकारक व्हिडिओ व फोटो पसरवले जात आहेत.
सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे आणि सोशल मीडियावरील बदनामीमुळे संपूर्ण कुटुंब तीव्र मानसिक त्रासाखाली असून, त्यांच्या जिवाला व सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी ललिता तारख यांनी संशयित सोशल मीडिया अकाउंट्सचे स्क्रीनशॉट्स आणि आलेल्या फोन कॉल्सचे पुरावे पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत. धमकी देणाऱ्यांवर आणि AI चा गैरवापर करून बदनामी करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पोलीस निरीक्षक, अंबड पोलीस ठाणे यांच्याकडे केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.