

Pre-monsoon rain alert in Maharashtra districts : एकीकडे उन्हाचे चटके लागत असतानाच दुसरीकडे राज्यातील जनतेला लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुणे आणि साताऱ्यासह कोकण आणि मराठवाड्यात पावसाची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात राज्याला पावसाचा दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही हवामानात बदल पाहायला मिळणार आहे. मुंबईत कमाल तापमान ३४ अंशांवर स्थिर राहणार असले, तरी आकाश ढगाळ राहील. तसेच मुंबई व आसपासच्या भागात हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज (Rain Update):
पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
ठाण्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा
ठाणे जिल्ह्यात आज सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, कशेळी, मुरबाड, कळवा, खारेगाव, घोडबंदर रोड आणि मुंब्रा या भागांत पहाटेपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ठाणेकर कडाक्याच्या उन्हामुळे आणि प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त झाले होते. आता या मान्सूनपूर्व पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.
वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; केळीच्या बागा जमीनदोस्त
जालना जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने शेती पिकांना मोठा फटका दिला आहे. परतूर तालुक्यातील फुलवाडी येथील महिला शेतकरी यशोदा आब्दल यांची दीड एकरावरील केळीची बाग वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. याशिवाय, फुलवाडी शिवारात झाडाची मोठी फांदी अंगावर पडून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. वादळी वाऱ्याच्या तीव्रतेमुळे अनेक घरांवरील सौरऊर्जेचे (सोलर) पॅनेल्स उडून नुकसान झाले आहे, तर अंगावर वीज किंवा झाड पडल्याने एक पशुधनही दगावल्याची माहिती समोर आली आहे.
जालन्यातील घनसावंगी आणि परतूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये या पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी संकटामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, सरकारने तात्काळ पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता बळीराजा करत आहे.
रत्नागिरीत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी; आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा परिसरात सकाळपासूनच मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. काल रात्रीही जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा गारवा मिळाला आहे. मात्र, पावसाच्या सुरुवातीसोबतच लांज्यात काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. दुसरीकडे, या ऐनवेळच्या पावसामुळे आंबा हंगामातील अंतिम टप्प्यातील पीक धोक्यात आले असून बागायतदार आणि शेतकरी चिंतेत पडले आहेत.
सोलापूरकर सुखावले! शहरात पावसाची दमदार हजेरी, वातावरणात गारवा
गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाड्याने आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या सोलापूरकरांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सोलापूर शहरात पावसाने अचानक दमदार हजेरी लावली. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने शहरातील तापमान तब्बल ४२ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते, ज्यामुळे भरदुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत होता. शनिवारी
सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि रात्री पावसाच्या सरी कोसळल्याने संपूर्ण वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला. या पावसामुळे लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत अनेकांनी भिजण्याचा आनंद घेतला. उकाड्यापासून सुटका झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, शेतकरी वर्गानेही या पावसाचे स्वागत केले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात उद्यापासून 'नवताप' सुरू; पारा ४६ अंशांच्या पार जाण्याची शक्यता, 'रेड अलर्ट' जारी
यवतमाळ जिल्हावासियांसाठी यंदाचा उन्हाळा कमालीचा दाहक ठरत आहे. अशातच नागरिकांच्या त्रासात आणखी भर पडणार आहे, कारण उद्या २५ मे पासून जिल्ह्यात 'नवताप' कालावधी सुरू होत आहे. २५ मे ते २ जून या काळात अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेचा आणखी एक तीव्र टप्पा पाहायला मिळेल. या काळात जिल्ह्याचा पारा ४६ अंश सेल्सिअसच्या पार जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने यवतमाळ जिल्ह्याला 'रेड अलर्ट' जारी केला असून, प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळण्याचे आणि अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.