

लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उलथापालथीचा दावा केला
ठाकरे भाजपसोबत आणि शिंदे पवारांसोबत जाण्याची शक्यता व्यक्त केली
२०२९ पूर्वी राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलतील
लक्ष्मण हाकेंच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी एक मोठा दावा करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. हाके यांनी २०२९ पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली आहे. ठाकरे भाजपसोबत तर शिंदे पवारांसोबत जाणार असल्याचं विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली.
लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राज्याचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलेल. भविष्यात एकनाथ शिंदे शरद पवारांसोबत दिसू शकतात. तर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपसोबत जाऊ शकतात. लक्ष्मण हाके यांनी हा दावा अशावेळी केला आहे जेव्हा राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
रविवारी लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी संवाद साधताना राजकीय भूकंपाबाबत मोठं विधान केले. त्यांनी पुढे सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या काळात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, शरद पवार आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २०२९ च्या निवडणुका एकत्र लढू शकतात. तर सध्या विरोधी पक्षात असलेले उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेत पुन्हा एकदा भाजपसोबत युती करू शकतात.
पुढे लक्ष्मण हाके यांनी स्पष्टपणे सांगितले की, राज ठाकरेंच्या मनसेकडे आता पूर्वीसारखा पाठिंबा राहिलेला नाही. त्यांना अजूनही अनेक वर्षे तयारी करावी लागेल. लक्ष्मण हाके यांनी असा देखील युक्तिवाद केला की, या नवीन ध्रुवीकरणाची सुरुवात अलिकडच्या पंचायत राज निवडणुकीत दिसून आली. अनेक ठिकाणी शिंदे यांच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रितपणे भाजपला विरोध केल्याचे पाहायला मिळाले. या विधानानंतर लक्ष्मण हाके आता चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.