Eknath Shinde : मी मोठा भाऊ गमावला...अजित पवार यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे भावुक

Eknath Shinde Statement On Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Eknath Shinde Statement On Ajit Pawar Death
Eknath Shinde Statement On Ajit Pawar DeathSaam Tv
Published On
Summary

अजित पवार यांचं अपघाती निधन

एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले दुःख

मी मोठा भाऊ गमावला - एकनाथ शिंदे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबियांसह कार्यकर्ते आणि नेतेमंडळी देखील भावुक झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते. त्यांच्या निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची भावना माझ्या मनात आहे. महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस असून एक दूरदर्शी, स्पष्टवक्ता आणि अतिशय अभ्यासू नेता आपण गमावला आहे. महायुती सरकारमधले ते केवळ माझे सहकारी नव्हते तर माझे चांगले मित्रही होते. त्यांचं अकाली जाणं जीवाला चटका लावणारं आहे अशा भावपूर्ण शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झालेल्या दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त करत म्हटले आहे की, महाराष्ट्र त्यांना दादा म्हणून ओळखायचा आणि ते तसे होते. त्यांच्याकडे ‘वेळ’ साधण्याचा अप्रतिम गूण होता. त्यांच्या कामाचा झपाटा आणि निर्णयक्षमता आम्ही सगळ्यांनी अनुभवली आहे. मी केवळ सहकारी म्हणूनच नाही तरी मित्र म्हणून सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलुंना जवळून पाहिलं आहे.

Eknath Shinde Statement On Ajit Pawar Death
Shocking : राजगडावर चढताना धाप लागली अन् खाली कोसळला, २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

अजित पवार यांच्या राजकारणातील नेतृत्वावर बोलताना शिंदे म्हणाले की, आमचं सरकार तीन पक्षांचे असले, तरीही निर्णय मात्र एकसंधपणे आणि एकजूटीने घेत आलो आहोत. विशेषतः अगदी प्रारंभीपासून राज्याची आर्थिक घडी चांगली बसावी यासाठी राज्याचा वित्तमंत्री म्हणून अजित दादांनी विकास कामांना खीळ बसू न देता अतिशय हातोटीने निर्णय घेतले. राज्यातील अनेक पायाभूत विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी मी मुख्यमंत्री असतांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो किंवा इतर काही योजना असो, उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री म्हणून अजितदादा यांनी वेळोवेळी पाठबळच दिले. अजित पवार यांच्यामध्ये परखड आणि जिथल्या-तिथे निर्णय घेण्याची क्षमता म्हणून दादांचा महाराष्ट्राला परिचय होता. वित्तमंत्री म्हणून त्यांच्याकडे सगळ्याच खात्यांबाबत माहिती असायची. पण म्हणून त्यांनी कधी शिष्टाचाराची चौकट मोडली नसल्याचं देखील शिंदे म्हणाले.

Eknath Shinde Statement On Ajit Pawar Death
Rain Alert : धुळे-जळगावात गारांचा पाऊस, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट, भर हिवाळ्यात पावसाचा धुमाकूळ, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

अजित पवार यांच्या व्यवहारिकतेवर बोलताना शिंदे म्हणाले, स्वप्नाळू सादरीकरण आणि केवळ सांगोवांगी गोष्टींपेक्षा ते व्यावहारिक गोष्टी पडताळून पहात. एखादी संकल्पना पुढे आली, की तिचा ते सर्वांबाजूंनी विचार करायला भाग पाडत. ती संकल्पना टिकेल कितपत, तिच्या भविष्यातील देखभालीची व्यवस्था इथपासून, ती लोकहिताची आहे का, कितीजणांसाठी ती उपयुक्त ठरणार आहे, अशा अनेक गोष्टींचा ते विचार करत. ठोस आणि तडकपणे निर्णय घेत असल्याने विधिमंडळातील आमदार आणि मंत्रिमंडळातील होतकरू-तरूण मंत्र्यांनाही अजितदादांच्या कार्यशैलीबाबत, दैनंदिनीबाबत कुतूहल असायचे. त्यांनाही वेळप्रसंगी ठणकावयाला ज्येष्ठत्वाच्या नात्याने दादा मागे पुढे पाहत नसत. छोट्या-मोठ्या गोष्टींचाही लोकप्रतिनिधींनी विचार करायला हवा. आपल्या निर्णयाचा लोकांच्या जीवनावर कसा आणि काय परिणाम होतो, याचा अभ्यास करायला हवा असा त्यांचा आग्रह असायचा. त्यामागे चूका काढण्याची नव्हेतर, त्यांची पुनरावृत्ती होऊ नये याची तळमळ असायची. आज दादा आपल्यात नाहीत ही कल्पना सुद्धा मनाला पटत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेवटी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com