

Maharashtra heatwave deaths latest news : महाराष्ट्रात सूर्य आग ओकतोय, सकाळी सात वाजल्यापासूनच कडाक्याचे ऊन जाणवत आहे. उष्णतेमुळे अनेकांना त्रास होत आहे. उष्मघातामुळे राज्यात ३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अकोला, हिंगोली आणि वाशिम या ठिकाणी उष्णघातामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंगोलीत बस स्थानकावर ३० वर्षाच्या तरूणाचा मृत्यू झाला तर वाशिममध्ये ४ दिवसांपूर्वी उष्मघातामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पुढे गेल्याचे नोंद झाली आहे. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
हिंगोलीमध्ये पहिला बळी -
उष्माघातामुळे हिंगोलीमध्ये पहिला बळी गेला आहे. हिंगोली शहरातील बस स्थानक परिसरात 30 वर्षीय तरुणाचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे अशी माहिती हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. शेख रफिक शेख उस्मान असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान हिंगोली जिल्ह्यात सध्या तापमानाने मोठा उच्चांक गाठला आहे, सकाळी आठ वाजल्यापासून तापमानाचा पारा वाढण्यास सुरुवात होत आहे तर दुपारी चार वाजेपर्यंत हिंगोली जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 40°c वर पोहचला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
वाशिममध्ये उष्मघातामुळे एकाचा मृत्यू
वाशिमच्या अनसिंग येथील नर्सरी परिसरात एका ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली. बुधवारी मृतदेह आढळून आला. मृत व्यक्ती अनसिंग पोलीस स्टेशन हद्दीतील शेलू बू येथील केशव गाढे आहे. त्याचा उष्मघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय.. मृतदेह 4 ते 5 दिवसा अगोदरचा असल्याचा अंदाज आहे.
मागील काही दिवसांपासून विदर्भासह महाराष्ट्र होरपळलाय. सूर्य आग ओकत असल्यामुळे अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार गेले आहे. महाराष्ट्रात पुढील तीन दिवस अतिउष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. गरज नसेल तर दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. अकोला, नंदूरबारसह विदर्भातील ४ जिल्हे देशातील सर्वोच्च तापमानात आली आहे. सकाळी ७ वाजल्यापासूनच तापमानात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे अनेकांना त्रास वाढत आहे. त्यामुळे राज्यात अनेकजण रूग्णालयात उपचार घेत आहेत.
मागील दीड महिन्यात ऊन वाढल्याने राज्यात उष्माघाताचे १७ पेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहेत. एक मार्च ते १५ एप्रिलदरम्यान उष्माघाताच्या १७रुग्णांची नोंद झाली आहे. रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत उष्माघातामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक चार रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले आहेत. जालना आणि पालघर येथे प्रत्येकी दोन रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात आढळलेल्या तीन रुग्णांपैकी दोन रुग्ण बुधवारी आढळले. गडचिरोली, गोंदिया, जळगाव, नंदुरबार, नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, जास्तीत जास्त पाणी प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.