
महाराष्ट्र सरकारने कामगारांचे कामाचे तास ९ वरून १२ केले.
दुकाने व आस्थापनांमध्ये ड्युटी ९ ऐवजी १० तास होणार.
ओव्हरटाईम मर्यादा ११५ तासांवरून १४४ तास करण्यात आली.
कामगारांना ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन मिळणार.
राज्यातील कामगारांसाठी महत्वाची बातमी आहे. कामगारांच्या कामाच्या तासांत मोठा बदल झाला आहे. कामाचे तास बदलले असून कामगारांना आता ९ ऐवजी १२ तासांची ड्युटी करावी लागणार आहे. महायुती सरकारने गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच, रोजगार संधी वाढीसाठी कामगार संदर्भातील अधिनियमात सुधारणा केली आहे. सरकारने कारखाने अधिनियम आणि आस्थापनांच्या अधिनियमात बदल केले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे कारखान्यांमध्ये दैनंदिन काम करणाऱ्या कामगारांना आता जास्त तास काम करावे लागणार आहे. कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा ९ तासांवरून १२ तास करण्यात आली आहे. तर दुकाने आणि आस्थापनांमध्ये दैनंदिन कामाचे तास ९ वरून १० तास करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारखाने अधिनियम १९४८ च्या कलम ५४ आणि महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाने सुचविलेल्या सुधारणानुसार कारखाने अधिनियम १९४८ मध्ये विविध सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. राज्यात गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी सरकारकडून कामाच्या तासांमध्ये बदल करण्यात आले आहे. कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, त्रिपुरा यासारख्या राज्यांनी कामगारांच्या कामाच्या तासामध्ये बदल आधीच केले आहेत. या राज्यांनंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील हा निर्णय घेतला.
सरकारने कामगार संदर्भातील अधिनियमात केलेल्या सुधारणांमुळे जास्त मागणी असलेल्या वेळेस किंवा कामगारांच्या कमतरतेमध्ये कोणत्याही व्यत्ययाशिवाय उद्योगांचे कामकाज चालू राहू शकते. कामगारांना योग्य वेतन संरक्षणासह कायदेशीररित्या अतिरिक्त उत्पन्न मिळेल. ओव्हरटाईम मर्यादा वाढवून कामगारांना मोबदल्याशिवाय अतिरिक्त काम करण्यास सांगितले जाते यापासून त्यांना संरक्षण मिळेल. यापुढे ओव्हरटाईम न देता कामगारांकडून काम करून घेण्याच्या प्रकाराला आळा बसेल. या बदलामुळे रोजगार निर्मितीस प्रोत्साहन मिळेल आणि कामगार हक्कांचे संरक्षण देखील होणार आहे. कामाच्या वेळेबाबत इतर राज्यातील तरतुदीप्रमाणे राज्य सरकारने तरतूद केल्याने नवीन गुंतवणूक आकर्षित होण्यास मदत होईल. महत्वाचे म्हणजे ओव्हरटाईम कामाचा कालावधी वाढविल्यामुळे कामगारांनाही मोबदला वेतनाच्या दुप्पट दराने मिळेल.
कारखाने अधिनियम सुधारणांमुळे कारखान्यातील विश्रांतीसाठी सुट्टीचा कालावधी ५ तासानंतर ३० मिनिटे याऐवजी ६ तासांपर्यंत ३० मिनिटे असा करण्यात आला आहे. कलम ५६ मध्ये सुधारणा करुन आठवड्याच्या कामाचा कार्याचा विस्तार कालावधी साडेदहा तासांवरुन १२ तास करण्यात आला आहे. कलम ६५ मधील सुधारणांमुळे अतिकालिक कामाच्या तासाची मर्यादा ११५ तास प्रति तिमाही यावरुन १४४ तास प्रति तिमाही अशी करण्यात येणार आहे. ओव्हरटाईम कामासाठी कामगारांची लेखी संमती घेणे आवश्यक असेल अशी कठोर तरतूद सुद्धा यामध्ये करण्यात आली आहे.
त्यासोबतच महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. ही सुधारणा २० आणि त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांना लागू असणार आहे. या सुधारणांनुसार दैनंदिन कामाचे तास ९ वरुन १० करणे, त्यास अनुसरुन विश्रांतीच्या सुट्टीच्या कालावधीत बदल करणे, तातडीचे काम सोपविलेल्या कर्मचाऱ्यांचे कार्यकालयोजन साडेदहा तासांवरून १२ तास करणे, अतिकालिक कामाचा कालावधी १२५ तासांवरुन १४४ तास करणे इत्यादी सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या सुधारणांमुळे कामगारांना फायदा होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.