महाराष्ट्र सायबर विभागाकडे दररोज ८ ते १० हजार सायबर फसवणुकीच्या तक्रारी
ऑक्टोबर २०२४ पासून ऑनलाइन फसवणुकीतील सुमारे १,६०० कोटी रुपये
ऑनलाइन फसवणुकीमुळे ६ ते ७ हजार कोटी रुपयांचे नुकसान
संजय गडदे,मुंबई
राज्यात गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असून पारंपरिक गुन्ह्यांसोबत सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या माध्यमातून नागरिकांना लाखो-कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला जात आहे. महाराष्ट्र सायबर विभागाकडे दररोज सायबर फसवणुकीच्या आठ ते दहा हजार तक्रारी येत असल्याची माहिती समोर आली आहे. भीती, घाई, पैशांचा लोभ, विश्वास, प्रेम आणि गोपनीयतेचा फायदा घेत सायबर भामटे नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचे चित्र आहे.
ऑक्टोबर २०२४ पासून ऑनलाइन फसवणुकीतील सुमारे १ हजार ६०० कोटी रुपये गोठवण्यात महाराष्ट्र सायबर विभागाला यश आले आहे. मात्र, याच काळात ऑनलाइन फसवणुकीमुळे सहा ते सात हजार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे गोठवण्यात आलेली रक्कम ही एकूण अंदाजित नुकसानीच्या केवळ ३० टक्क्यांच्या आसपास आहे. दुसरीकडे, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ऑनलाइन फसवणुकीतील आर्थिक नुकसान १० ते १५ टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. कोविडनंतर प्रथमच सायबर फसवणुकीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीत घट झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
गुंतवणुकीच्या नावाखाली केली जाणारी फसवणूक आणि सेक्सटॉर्शन हे सध्या प्रमुख सायबर गुन्ह्यांपैकी आहेत. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका निवृत्त बँक अधिकाऱ्याची ५८ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणात संपूर्ण रक्कम वसूल करण्यात यश आल्याची माहिती आहे. तसेच ऑनलाइन छळ, सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगच्या जाळ्यात अडकलेल्या २३७ मुली व मुलांना वाचवल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाने सांगितले.
गॅस बिलाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने दोन हजारांहून अधिक नागरिकांची फसवणूक करून ४३ कोटी २५ लाख रुपये जमा केल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे. सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीसाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जात असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. अनोळखी लिंकवर क्लिक करणे, संशयास्पद गुंतवणूक योजनांवर विश्वास ठेवणे किंवा वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याचा तपशील अनोळखी व्यक्तींना देणे टाळावे. सायबर फसवणूक झाल्यास विलंब न करता १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.