भरत नागणे, साम टीव्ही
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता आता टोकाला गेली आहे. पाणी नाही म्हणून माढा तालुक्यातील तुळशी गावानेच गाव विकायला काढल्याचे धक्कादायक बोर्ड या गावात लावले आहेत. गाव सभेने तसा ठराव देखील केला आहे. दुष्काळाच्या झळा सोसत असलेलं हे आहे, माढा तालुक्यातील तुळशी गाव. गेल्या अनेक महिन्यांपासून या गावात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्यातच दुष्काळामुळे विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही पाणी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या तरुणांनी आणि ग्रामस्थांनी अखेर एकत्र येऊन संपूर्ण गावच विकायला काढले आहे. गावाच्या वेशीवर, ग्रामपंचायतीच्या भिंतीवर "हे गाव विकणे आहे" अशा आशयाचे फलक लावले आहेत.
आम्हाला पाणी नाही, जनावरांना पाणी नाही. रोज पाण्यासाठी वणवण करावी लागते. सरकार लक्ष देत नाही म्हणून आम्ही गाव विकायला काढले आहे, असा मजकूर फलकावर लिहिला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा केवळ संताप नाही तर गावसभेत याबाबत अधिकृत ठराव देखील मंजूर करण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. तुळशी गावातील महिला रोज २-३ किलोमीटर पायपीट करून पाणी आणतात. गावातील तरुण वर्ग पाण्याच्या शोधात स्थलांतराच्या वाटेवर आहे. पाणी नसल्याने शेती तर सोडाच, पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे.
इतकेच नाही तर गावात पिण्याचे पाणी आणि शेतीला पाणी नसल्याने येथील तरुणांची लग्न देखील होत नसल्याची धक्कादायक वास्तव या निमित्ताने समोर आले आहे. गावात सुमारे 300 हून अधिक तरुण मुलं लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. लग्न होत नसल्याने तरुण चिंतेत आहेत. गावाची अर्थव्यवस्था ही दूध उत्पादनावर चालते मागील सहा महिन्यापूर्वी दैनंदिन 40 हजार लिटर दुधाचे उत्पादन करणारे हे गाव आता केवळ पंधरा ते वीस हजार लिटर वरती आला आहे त्यामुळे गावातील शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.
पाण्यावाचून लेकरं तहानलेली, हंडाभर पाण्यासाठी दिवसभर फिरावं लागतंय. सरकारने आम्हाला पाणी द्यावं नाहीतर गाव विकत घ्यावं. एकिकडे सरकार दुष्काळी GR काढत असल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात गावकऱ्यांना गाव विकायची वेळ येणं, हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. तुळशी गावचा हा बोर्ड आंदोलनाचा इशारा आहे की हतबलतेचा टोकाचा टप्पा, हे येणारा काळच ठरवेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.