

Pune and Nagpur police action against LPG black marketing : इराण-इस्रायल या आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाचे संकट उभे ठाकले आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक हॉटेल्स बंद झाली आहेत. पुणे, नागपूरसह काही जिल्ह्यांत घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता या काळाबाजाराविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे आणि नागपूर प्रशासनाकडून यासाठी काही पथके तयार करण्यात आली आहेत. त्याशिवाय, कोणी काळाबाजार करत असल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्याबरोबरच याचा अवैध वापर रोखण्यासाठी दक्षता पथकांची स्थापना करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांच्या, तर ग्रामीण भागात सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी चार सदस्यांचा पथकात समावेश आहे. जिल्हा आणि तालुका पातळीवर घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी तसेच अवैध गॅस वापर रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत ही दक्षता पथके कार्यरत राहतील.
या पथकात अन्नधान्य वितरण अधिकारी, पुरवठा निरीक्षण अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि एलपीजी कंपनीचे संबंधित क्षेत्र अधिकारी अशा चार सदस्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या पथकात पुरवठा निरीक्षण अधिकारी, पोलीस निरीक्षक किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एलपीजी कंपनीचे संबंधित क्षेत्र अधिकारी अशा चार जणांचा समावेश करण्यात आला आहे.
नागपूरमध्येही पथकांची स्थापना
नागपुरात एलपीजी सिलिंडरच्या काळाबाजारावर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या निर्देशानुसार शहरातील वितरक, गोदामे आणि संशयित ठिकाणांची अचानक तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अवैध साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे साठेबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पोलिसांची त्यांच्यावर करडी नजर असणार आहे.
नागपुरात एलपीजी सिलिंडरच्या काळाबाजारावर पोलिसांची विशेष मोहीम
घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरची अवैध विक्री होत असल्यास तातडीने कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी गुन्हे शाखेची दोन विशेष पथके तपासासाठी तैनात करण्यात आली आहेत. वितरक, गोदामे आणि संशयित ठिकाणांची अचानक तपासणी केली जाणार आहे. पूर्वी काळाबाजारात सहभागी असलेल्या हिस्ट्रीशीटरवरही (गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर) पोलिसांची नजर असेल. नागपूर शहरातील विविध भागांत पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे. सिलिंडर साठेबाजीची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नये
नागपूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असा खुलासा नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. इंधनाचा पुरवठा नियमित आणि सुरळीत राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच, दर महिन्याला मिळणाऱ्या सिलिंडर बुकिंगची मर्यादा १५ दिवसांवरून २५ दिवसांवर करण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.