

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम
भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये उमेदवारी व जागावाटपावरून रस्सीखेच
गोकुळच्या सत्तेसाठी आवश्यक मतांची जुळवाजुळव आणि ठरावांवरून राजकीय हालचालींना वेग
गोकुळच्या निवडणुकीने थेट महायुतीला हादरे द्यायला सुरुवात केली आहे. जागा वाटपावरुन राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष सुरु आहे. अशा स्थितीत गोकुळच्या मैदानात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उतरले आहेत. जागावाटपाचा फॉम्युर्ला काय असणार? पाहूया या विशेष रिपोर्टमधून.
‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीने कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघालंय. अर्ज दाखल करण्यास सुरूवात होत असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कोल्हापूर दौरा असल्याने राजकीय चर्चेला उधाण आलंय. सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि भाजपच्या नेत्यांमध्ये ज्या पद्धतीने आरोप, प्रत्यारोप चालले आहेत, या पार्श्वभूमीवर शाह यांचा 19 सप्टेंबरचा कोल्हापुरातील मुक्काम महत्वाचा आहे.
यापूर्वी संस्थांच्या पात्र-अपात्रतेवरून भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये सुरू असलेला संघर्ष संपला असताना आता जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरून मित्र पक्षांमधील संघर्ष वाढला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत ज्याचे अधिक ठराव त्याला अधिक जागा हे सूत्र ठरले असताना त्याला भाजपच्या काही नेत्यांकडून विरोध सुरू झाला आहे. राष्ट्रवादीकडून ठरावानुसार जागावाटप व्हावे तर भाजपकडून महायुती म्हणून जागा वाटप व्हावे अशी मागणी होतेय. त्यामुळे जागा वाटपाची चर्चा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेली आहे. मात्र आता अमित शाह कोल्हापुरात येत असल्यानं महायुतीचं जागावाटपाचं सूत्र अंतिम होण्याची शक्यता आहे.
महायुतीतील सर्वपक्षीय नेत्यांनी मोठा गाजावाजा करत आणि शक्तिप्रदर्शन करत ठरावाचा आकडा फुगवलेला दिसतो. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठराव दाखल केले. कोणत्या पक्षाचे किती ठराव आहेत ते पाहूया.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जवळपास 1971 ठराव दाखल केल्याचा दावा केला. भाजपकडून 1431, शिवसेनेकडून 1514 तर जनसुराज्य कडून 547 ठराव असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर काँग्रेसकडे 1851 ठराव असल्याचा दावा केला. पण प्रत्यक्षात तालुका निहाय 5439 ठराव दाखल झाले आहेत. दुबार ठराव 56 असून 31 संस्थानी ठराव दाखल केलेले नाहीत.
मतदानासाठी ५,४२३ दूध संस्था पात्र ठरल्या असून १८ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. मात्र गोकुळमध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचं विधान नुकतच मुश्रीफ यांनी केलं होतं. त्यामुळे जागावाटपावरून महायुतीत फूट पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं अर्थकारण अवलंबून असलेल्या गोकुळमध्ये महायुती एकजुटीनं काँग्रेसला शह देणार की तिरंगी लढत रंगणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.