

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी ग्रॅच्युइटीबाबत शासन सकारात्मक
ग्रॅच्युइटीबाबत अंतिम निर्णय आणि अंमलबजावणीची प्रक्रिया
‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ ही यंदाच्या पोषण माहाची संकल्पना आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविका-मदतनीसांसाठी आनंदाची बातमी आहे. ही बातमी आहे, त्यांच्या ग्रॅच्युइटीबाबत असून येत्या काही दिवसात त्यांना उपदान मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. याबाबतीच माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलीय. आदिती तटकरे यांच्या हस्ते 9व्या राष्ट्रीय पोषण माहाचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला.
‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ या यंदाच्या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना ही दिलासादायक बातमी दिलीय. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना उपदान (ग्रॅच्युइटी) देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं.
पोषण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, समाजातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या माध्यमातून बालके, गरोदर माता आणि स्तनदा मातांपर्यंत पोहोचून सुदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पोषण माहाच्या माध्यमातून बालके, गरोदर माता आणि स्तनदा मातांच्या आहार व आरोग्याबाबत जनजागृती करण्यासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत आहे. यासाठी महिला व बालविकास, आरोग्य आणि आयुष विभागाने समन्वयाने काम करण्याची गरज आहे.
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी जन्मापासूनच योग्य पद्धतीने शिशु अभ्यंग मिळणे आवश्यक असून त्यांचे महत्व मातांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयुष विभागाचा सहभाग घेण्यात आलाय. आयुषच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीसांना आवश्यक मार्गदर्शन देऊन ही माहिती मातांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तसेच यंदाच्या ‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून अंगणवाडी केंद्रे अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती आदिती तटकरे म्हणाल्या.
गेल्या वर्षीच्या 8व्या राष्ट्रीय पोषण माहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वर्धा, हिंगोली आणि नागपूर जिल्हा कार्यालयांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. वर्धाच्या जिल्हा कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे व सहकारी, हिंगोलीचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विजय बोराटे आणि नागपूरचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी कैलास घोडके यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. यासह प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वर्धा, मुंबई आणि नाशिक जिल्ह्यांचाही सन्मान करण्यात आला.
यात मनिषा कुरसंगे, मुंबई जिल्हा कार्य अधिकारी प्रेमा घाडगे, मुंबई उपनगर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शरद कुऱ्हाडे, पर्यवेक्षक भाऊसाहेब बोरकर आणि नाशिकचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांचा गौरव करण्यात आला. ज्योती गायकवाड, शुभांगी लोहकर आणि कांता गायकवाड या अंगणवाडी सेविकांचाही योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.
सक्षम अंगणवाडी प्रकल्प योजनेअंतर्गत स्नेहा सामाजिक संस्था आणि एकात्मिक बालविकास सेवा यांच्यात करार करण्यात आला. या करारानुसार मुंबईतील 817 अंगणवाड्या आवश्यक सोयी-सुविधांनी सुसज्ज करून सक्षम करण्यासाठी काम केले जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.