

एकनाथ खडसे आणि कन्येविरोधात फसवणुकीचा गुन्हा
साखर कारखान्याच्या नावाखाली जमीन व्यवहाराचा आरोप
जळगावच्या बोदवड पोलीस ठाण्यात FIR दाखल करणअयात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. साखर कारखाना उभारण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या महार वतनाच्या जमिनी हडपल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, हे प्रकरण वर्ष २००२ मधील आहे. भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील गट क्रमांक १२२ ही महार वतनाची जमीन चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसदारांच्या मालकीची होती. एकनाथ खडसेंनी या परिसरात 'तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना' सुरू करणार असल्याचं सांगितले. कारखाना उभारण्याचे आमिष दाखवून त्यांनी ही जमीन खरेदी करण्याची तयारी दर्शवली. जमिनीचा चांगला मोबदला आणि कुटुंबातील सदस्यांना कारखान्यात रोजगार देण्याचे आश्वासन दिले.
तक्रारदार चमेलाबाई तायडे यांच्या म्हणण्यानुसार, खडसेंनी त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत ५१ हजार रुपये आगाऊ दिले. जमीन मालकाच्या घरातील सर्वांचे अंगठे घेऊन बोदवड दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची खरेदी केली. मात्र अनेक वर्षे उलटूनही तिथे कारखाना उभारला नाही. त्यानंतर २०२५ मध्ये कुटुंबाने या जमिनीची माहिती काढली तेव्हा ही जमीन कारखान्याच्या नावावर नसून शारदा एकनाथ खडसे यांच्या वैयक्तिक नावावर असल्याची बाब तायडे कुटुंबियांच्या निदर्शनात आली.
११ फेब्रुवारी २०२६ रोजी जेव्हा मूळ खरेदीखताची प्रत तपासण्यात आली, तेव्हा त्यात धक्कादायक फेरफार झाल्याचं दिसून आले. खरेदीखतामध्ये जेथे 'तापी-पूर्णा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज' असे नाव होते, तिथे खाडाखोड करून 'शारदा एकनाथ खडसे' असे नाव लिहिण्यात आल्याचे दिसेल. यानंतर तायडे कुटुंबाने रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या मदतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.