

इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम.
होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे भारतात एलपीजी गॅस टंचाई.
महाराष्ट्रातील उद्योग-धंदे आणि हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम.
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे महाराष्ट्रासह देशभरात गंभीर गॅस टंचाई निर्माण झालीय. अमेरिकेकडून इराणवर सातत्यानं हल्ले सुरू आहेत. अशात इराणने क्रूड ऑईलची वाहतूक होणारा मार्ग सामुद्रधुनी म्हणजेच होर्मुज स्ट्रेट बंद केला आहे. तेथून वाहतूक करणाऱ्या जहाजांवर इराणकडून हल्ले केले जात आहेत.
पश्चिम-आशियामधील तणावामुळे देशभरात एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईमुळे राज्यातील उद्योग-धंदे ठप्प झाली आहेत. अनेकांना बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अनेक शहरातील हॉटेलदेखील बंद पडली आहेत. तर गँस नसल्यामुळे काही हॉटेल चालकांवर चूल पेटवण्याची वेळ आली आहे.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका महाराष्ट्राला बसला आहे. या युद्धामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसच्या तुटवड्याचा फटका मुंबईतील हॉटेल व्यवसायाला बसू लागला आहे. गॅस सिलिंडरचा तुटवड्यामुळे मुंबई, पुण्यासह काही प्रमुख शहरातील अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद करण्याची वेळ आली आहे. असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स म्हणजे अहवालानुसार गॅस पुरवठ्याअभावी मुंबई शहरातील २० टक्के हॉटेल्स सध्या बंद आहेत. अशीच टंचाई पुढील २ ते ३ दिवस चालू राहिली तर मुंबईतील ५० टक्के हॉटेल्स बंद पडू शकतात.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता स्थानिक उद्योगांवरही दिसू लागला आहे. गेल्या तीन दिवसांपासून इंडस्ट्रियल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अहिल्यानगर MIDC मधील सुमारे 300 उद्योगांवर त्याचा थेट परिणाम झाला असून तब्बल 3 हजार कर्मचाऱ्यांचे काम बंद पडले आहे. MIDC परिसरातील अनेक उद्योगांमध्ये उत्पादन प्रक्रियेसाठी इंडस्ट्रियल गॅस अत्यावश्यक असतो.
विशेषतः इलेक्ट्रिकल मोटार तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये गॅसवर आधारित प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून गॅस उपलब्ध नसल्याने अनेक उद्योगांतील उत्पादन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहेत. दरम्यान, सरकारने तातडीने हालचाल करून इंडस्ट्रियल गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी MIDC मधील उद्योजकांकडून करण्यात येत आहे.
आशिया खंडातील नंबर वन पंचतारांकीत औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहती वरती गॅसच्या तुटवड्यामुळे मोठा परिणाम झाला असून 30% कंपन्या या ठप्प होण्याच्या मार्गावरती आहेत. त्यामुळे उद्योग व्यवसायातील साखळीच विस्कळीत झालीय,अचानक गॅसचा तुटवडा कसा झाला याबाबत साठेबाजी होण्याची भीतीही इंडस्ट्रियल फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप बटवाल यांनी बोलताना व्यक्त केली. खासदार संजय राऊत यांनी औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या बंदची माहिती कुठून घेतली हे माहित नाही मात्र राऊतांच्या विधानाला त्यांनी दुजोरा दिला आहे.
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर घेण्यासाठी नागरिकांनी लांबच लांब रांग लावल्याचे चित्र चाकण परिसरात पाहायला मिळालं. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. चाकण आणि महाळुंगे एमआयडीसी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार हजारोंच्या संख्येत राहतात. स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडर लागत असल्याने LPG गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गॅस एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावल्या.
दरम्यान ठाण्यात व्यावसायिक वापराच्या एलपीजीचा काळा बाजार सुरु झाला आहे. त्यामुळे एरवी 1800 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर ब्लॅकमध्ये तब्बल 4000 ते 4500 रुपयांना विकला जात आहे. यामुळे ठाण्यातील 80 टक्क्याहून अधिक हॉटेल्स आणि सोमवारनंतर बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
सध्या सर्वत्र इंधन तुटवडा सुरू असल्यानं एलपीजी इंधन साठा कमी प्रमाणात होत चालल्याने रायगडच्या कर्जतमध्ये नागरिकांनी भारत गॅस वितरण केंद्रावर सकाळपासून मोठी गर्दी केली आहे. घरगुती गॅस सिलेंडर मिळणार की नाही, या भीतीपोटी अनेक नागरिक सिलेंडरच्या टाक्या घेऊन केंद्रावर रांगेत उभे राहिले आहेत.
जालन्यात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे. जालना जिल्ह्यात तालुकास्तरावर तपासणी पथके स्थापन करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत.घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलले आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना घरगुती गॅसच्या वितरणावर लक्ष ठेवून नियमित तपासणी करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.
Lpg गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी सध्या रत्नागिरी शहरात भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य समिती नेमण्यात आली आहे. तहसीलदार आणि पुरवठा शाखेतील दोन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गॅस एजन्सीची तपासणी होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.