

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात ५००० रुपये जमा होणार
फडणवीस सरकारची शेतकऱ्यांसाठी दुष्काळ मदत योजना
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचे पैसेही मिळणार
राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. यंदा दिवाळी साजरी कशी करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यातच शेतकऱ्यांना दिलासा म्हणून फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला. दिवाळीपूर्वी फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मोठा गिफ्ट देण्याची घोषणा केली होती. दिवाळीपूर्वी दुष्काळ निवारण्यासाठी शेतकऱ्यांना सरकार प्रत्येकी ५००० रुपये देण्याचे सांगितले होते. यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यात आज-उद्या ५००० रुपये जमा होतील, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दुष्काळ निवारण मदत आणि कर्जमाफीबाबत महत्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 'राज्यातील ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५००० रुपये जमा झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात आज-उद्या पैसे जमा होतील. कर्जमाफीचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. मराठवाड्यातील २,७६,००० शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे वर्ग करण्यात आले आहे. कर्जमाफीचा सर्वाधिक लाभ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे.'
सर्व मंत्री शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व मंत्र्यांना आदेश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, 'महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सर्व मंत्री शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. याबाबत सर्व मंत्र्यांना आदेश देण्यात आले आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करणार आहे.' तसंच, 'महायुती सरकारने ७ टीएमसी पाणी दिलं. पाणी योजनेचे काम लवकरच पूर्ण होईल.', असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. आज ४ लाख ८६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४७६४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. आजच्या यादीत २ लाख ७६ हजार शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले. सर्वाधिक शेतकरी मराठवाड्यातील आहेत. आतापर्यंत एकूण २० लाख ७२ हजार शेतकऱ्यांना १८,०४२ कोटी रुपये देण्यात आले आहे.
दरम्यान, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला मंत्री अतुल सावे धावून आले आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी १ कोटींची मदत दिली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये १ कोटींच्या देणगीचा धनादेश त्यांनी सुपूर्द केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री अतुल सावेंचे आभार मानले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.