

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे.
‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’च्या माध्यमातून महायुती निवडणूक लढणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला ९, भाजपला ७ आणि शिवसेनेला ७ जागा मिळाल्या आहेत.
रणजीत माजगावकर, साम प्रतिनिधी
कोल्हापूरच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी अखेर महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य या घटक पक्षांमध्ये जागांसाठी रस्सीखेच सुरू होती. हा तिढा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवर पोहोचला आणि बैठकीनंतर जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात झालाय.
‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’च्या माध्यमातून महायुती गोकुळच्या मैदानात उतरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ९, भाजपला ७, शिवसेनेला ७ आणि जनसुराज्य पक्षाला २ जागा असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या ९ जागांमध्ये राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाला एका जागेचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चेनंतर आता महायुतीतील घटक पक्षांनी समन्वयाने निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. महायुतीच्या पॅनेलची धुरा मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र, जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असला, तरी गोकुळच्या २५ जागांवर उमेदवार कोण? कोणाला संधी आणि कोणाला डच्चू? याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
गोकुळच्या निमित्ताने महायुतीची एकजूट आणि स्थानिक नेत्यांचा प्रभाव या दोन्हींची परीक्षा होणार आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सुटला असला, तरी उमेदवार निवडीपासून प्रचारापर्यंत महायुतीसमोरचं पुढचं आव्हान महत्त्वाचं ठरणार आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आजच्या जागा वाटपाच्या बैठकीनंतर याची अधिकृत घोषणा केली. गेल्या सहा महिन्यांपासून या निवडणुकीवरुन महायुतीमध्ये कडवटपणा आल होता.
पण आता जागावाटप झाल्यानं शेवट गोड झालाय अशी भावना चंद्रकांत पाटलांनी यावेळी बोलून दाखवली. आज महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व मतभेद दूर करण्यात यश आलं. या बैठकीला उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील आमदार विनय कोरे, समित कदम यांची प्रमुख उपस्थिती होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.