Gokul Milk Union: गोकुळचा अध्यक्ष कोण ठरवणार?गोकुळच्या सत्तासंघर्षात नवा कायदेशीर पेच, निवडणुकीकडे कोल्हापूरचं लक्ष!

Gokul chairman poll: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीपूर्वी चार शासन नियुक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकारावरून नवा पेच निर्माण झाला आहे. १३ विरुद्ध १२ या संख्याबळात बदल होणार का? औरंगाबाद खंडपीठाचा आदेश, सहकार कायद्यातील नोटीस प्रक्रिया आणि उद्याच्या निवडीकडे कोल्हापूरचे लक्ष लागले आहे.
Gokul Milk Union
Gokul Milk Unionsaam tv
Published On: 

रणजीत माजगावकर, प्रतिनिधी

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीचा उद्या फैसला होणार असला, तरी शासन नियुक्त चार संचालकांच्या मतदानाच्या अधिकारावरून नवा पेच निर्माण झाला आहे. औरंगाबाद खंडपीठाने ठरल्याप्रमाणे अध्यक्ष निवड प्रक्रिया घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, शासनाने आजच चार स्वीकृत संचालकांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे या चारही संचालकांना मतदान करता येणार का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार अध्यक्ष निवडीसाठी संचालकांना नियमानुसार पूर्वसूचना देणं आवश्यक आहे.

विशेष परिस्थितीतही किमान तीन दिवसांची नोटीस देण्याची तरतूद आहे. मात्र, शासन नियुक्त चार संचालकांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे उद्याच्या अध्यक्ष निवडीत या चार संचालकांना मतदानाचा अधिकार मिळणार की केवळ निवडून आलेल्या २५ संचालकांनाच मतदान करता येणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कारण या निर्णयावरच गोकुळमधील सत्तेचं गणित अवलंबून असणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अध्यक्ष निवडीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला असला, तरी गोकुळची कोंडी अद्याप सुटलेली नाही.

२५ निवडून आलेल्या संचालकांमध्ये समविचारी आघाडीचे १३, तर महायुतीचे १२ संचालक आहेत. केवळ या २५ संचालकांनाच मतदानाची संधी मिळाल्यास १३ विरुद्ध १२ असं संख्याबळ कायम राहणार आहे. मात्र, शासन नियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यास महायुतीच्या १२ मतांमध्ये आणखी चार मतांची भर पडून हे संख्याबळ १६ पर्यंत पोहोचू शकतं.

त्यामुळे उद्या निवडणूक निर्णय अधिकारी नेमकी कोणती भूमिका घेणार? न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आणि सहकार कायद्यातील नोटीस प्रक्रियेचा ताळमेळ कसा साधणार? याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

Gokul Milk Union
Satej Patil: कोल्हापुरातून सत्तांतराचं बीज पेरलं गेलंय, २०२९ मध्ये महाराष्ट्रात परिवर्तन घडवणार; सतेज पाटलांचा सरकाराला इशारा

गोकुळ अध्यक्ष निवडीत मतदानाचा पेच!

एकूण निवडून आलेले संचालक – २५

समविचारी आघाडी – १३

महायुती – १२

पर्याय क्रमांक १ : केवळ २५ संचालकांना मतदान

समविचारी आघाडी – १३ मते

महायुती – १२ मते

पर्याय क्रमांक २ : शासन नियुक्त चार संचालकांनाही मतदानाचा अधिकार

महायुती – १२ + ४ = १६ मते

समविचारी आघाडी – १३ मते

Gokul Milk Union
गोकुळ निवडणुकीत ट्विस्ट! अध्यक्ष ठरला; सतेज पाटलांनी डाव टाकला

आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, शासन नियुक्त चार संचालकांना नोटीस बजावण्यात आली आहे का?

नोटीसशिवाय त्यांना मतदानाचा अधिकार देता येणार का?

निवडणूक निर्णय अधिकारी कोणती भूमिका घेणार?

गोकुळच्या अध्यक्ष निवडीत उद्या नेमकं काय घडणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.