रणजित माजगांवकर, साम टीव्ही
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. महायुतीचे संचालक उपस्थित नसताना समविचारी आघाडीच्या संचालकांनी समांतर सभा घेत शशिकांत चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केल्याचा दावा केला आहे. समविचारी आघाडीकडे २५ पैकी १३ संचालक असल्याने आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीला मान्यता न दिल्याने बहुमताच्या जोरावर समांतर सभा घेऊन अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पाडल्याचे संचालकांनी सांगितले. या निवडीनंतर शशिकांत चुयेकर यांनी आजपासून गोकुळचा अध्यक्ष मीच आहे अशी घोषणा केली. मात्र, या समांतर निवडीला अधिकृत मान्यता मिळाली आहे का, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे.
कॉँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीकडे बहुमत असल्याने अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेला परवानगी द्यावी, अशी विनंती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, त्यांनी ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला विरोध करत आम्ही समांतर सभा घेतली आणि १३ संचालकांच्या उपस्थितीत माझी अध्यक्षपदी निवड केली असे शशिकांत चुयेकर यांनी सांगितले. कायदेशीररीत्या मी चेअरमन झालो आहे. आता गोकुळचे कामकाज सुरू करणार आहे. दूध संकलन कमी झाले असून दूध वाढीसाठी सर्वप्रथम प्रयत्न करणार आहे असेही चुयेकर यांनी स्पष्ट केले.
गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे यांनीही या निवडीबाबत भूमिका मांडली. शासनाने अनेक अडचणी निर्माण करण्याचा आणि कायदेशीर बाबींमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. २५ पैकी १३ संचालक आपल्या बाजूने असल्याने आपल्याकडे बहुमत असल्याचे त्यांनी सांगितले. गोकुळच्या पोटनियमांनुसार अध्यक्ष निवडीची प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण व्हावी, असा आमचा आग्रह आहे. संघावर सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रशासक असल्याचा दावा करत त्यांनी सध्याच्या आर्थिक परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. गोकुळला मोठ्या प्रमाणात तोटा होत असल्याचे सांगत अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.
समविचारी आघाडीने शशिकांत चुयेकर यांची समांतर सभेत निवड केल्याचा दावा केला असला, तरी या निवडीची अधिकृत आणि कायदेशीर स्थिती स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका, संबंधित नियम आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतरच अध्यक्षपदाबाबतची स्थिती स्पष्ट होईल. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेला हा वाद आता कोणते वळण घेतो, याकडे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.