गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतानाही अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल २२ लाख ९९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन चारचाकी वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली पोलीस आणि आष्टी पोलीसांनी ३० आणि ३१ जुलै रोजी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली.
गडचिरोली - आरमोरी मार्गावर करण्यात आलेल्या पहिल्या कारवाईत बलेनो कारमधून मोठ्या प्रमाणात देशी - विदेशी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणात प्रमोद भोयर आणि मुकेश बोधलकप यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याक आला आहे. तर आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येणापूर येथे बोलेरो पिकअपमधून दारूची वाहतूक करणाऱ्या अब्दुल फरहान शेख याला अटक करण्यात आली.
या कारवाईत मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्य आणि वाहन जप्त करण्यात आले. दोन्ही कारवायांमध्ये मिळून २२ लाख ९९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली आणि आष्टी पोलिसांनी संयुक्तपणे पार पाडली आहे.