भूषण अहिरे, साम टीव्ही
धुळे: महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करून संपूर्ण महाराष्ट्रभर दहशत माजवणाऱ्या 'इराणी गँग'च्या एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात शिरपूर शहर पोलिसांना मोठे यश आले आहे. आशु उर्फ हसन अली इराणी असे या मुख्य आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला आणि त्याच्या पत्नीला मुद्देमालासह अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 26 हून अधिक गुन्हे उघडकीस आले आहेत.
24 जुलै रोजी शिरपूर शहरातील हिरा नगर आणि गायत्री कॉलनी परिसरात मीना अग्रवाल आणि मीराबाई धनगर या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने हिसकावली होती. या घटनेनंतर शिरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास चक्रे वेगाने फिरवली. हा गुन्हा भुसावळ येथील 'इराणी गँग'चा सराईत गुन्हेगार आशु उर्फ हसन अली याने आपल्या साथीदारासह केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी वेशांतर करून मुक्ताईनगर येथील एका हॉटेलमधून आशुला शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरीचे सोने त्याची पत्नी फातिमा हिच्याकडे दिल्याचे सांगितले. पोलिसांनी फातिमालाही भुसावळ येथून अटक केली असून, विकलेले 75 हजार रुपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगड हस्तगत केले आहे. विशेष म्हणजे, आरोपी आशु इराणी याच्यावर वाशिम, अमरावती, जळगाव, धुळे आणि इतर जिल्ह्यांमध्ये तब्बल 26 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.