BEST Mumbai: मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार! 1,500 नव्या एसी इलेक्ट्रिक ताफ्यात येणार; बेस्टचा मास्टरप्लॅन वाचा

मुंबईतील बेस्ट सेवेत लवकरच 1,500 नवीन एसी इलेक्ट्रिक मिडी बस दाखल होणार आहेत. PM E-Drive योजनेअंतर्गत येणाऱ्या या बसमुळे बसमार्ग वाढणार, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि प्रवाशांना पर्यावरणपूरक, सुरक्षित व आधुनिक सार्वजनिक वाहतूक सुविधा मिळणार.
BEST Mumbai
BEST Mumbaisaam tv
Published On

मुंबईकरांसाठी सार्वजनिक वाहतूक अधिक सोयीची आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत बेस्ट समितीने मंगळवारी 1,500 एसी इलेक्ट्रिक मिडी बस खरेदीला मंजुरी दिली. या बस केंद्र सरकारच्या PM E-Drive योजनेअंतर्गत आणल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे मुंबईतील बेस्टच्या बससेवेत मोठा बदल होणार असून सध्या असलेल्या सुमारे 400 बसमार्गांची संख्या वाढून लवकरच 525 पर्यंत जाणार आहे. काही वर्षांपूर्वी बंद झालेल्या काही बसमार्गांनाही पुन्हा सुरू करण्याची तयारी बेस्टकडून केली जातेय, अशी माहिती बैठकीनंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलीये.

या नव्या मिडी बस आकाराने लहान असल्यामुळे त्या अरुंद रस्ते, छोट्या गल्ल्या आणि डोंगराळ भागांमध्येही सहज धावू शकतील. मोठ्या बस जिथे जाऊ शकत नाहीत तिथे या बस सेवा देऊ शकणार असल्याने अनेक भागांतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

BEST Mumbai
Best Strike : मुंबईकरांचे हाल होणार, BEST चे हजारो कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर, या आहेत प्रमुख मागण्या

बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी सांगितलं की, हा प्रकल्प मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक बनवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने 2027 पर्यंत मुंबईत 10 हजार बस उपलब्ध करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. त्यामुळे प्रत्येक एक हजार लोकसंख्येमागे 0.6 बस उपलब्ध करण्याच्या दिशेनेही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

या 1,500 इलेक्ट्रिक बस 2026 आणि 2027 या दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने बेस्टच्या ताफ्यात दाखल केल्या जाणार आहेत. त्यामुळे शहरात स्वच्छ, वेगवान आणि सर्वांसाठी अधिक सुलभ अशी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होणार आहे. यातील सुमारे 250 इलेक्ट्रिक बस यावर्षी डिसेंबरअखेरपर्यंत सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. या बस खरेदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर 30 ऑक्टोबर 2025 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.

नव्या 9 मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक मिडी बस विशेषतः फीडर सेवा आणि 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी' लक्षात घेऊन तयार करण्यात आल्या आहेत. म्हणजेच मेट्रो स्टेशन, रेल्वे स्टेशन किंवा इतर प्रमुख वाहतूक केंद्रांपर्यंत प्रवाशांना सहज पोहोचता यावं यासाठी या बस महत्त्वाच्या ठरू शकतात. या बस आकाराने लहान असल्याने गर्दीच्या आणि अरुंद रस्त्यांवरही त्या सहज धावू शकतील.

BEST Mumbai
Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

या बसमध्ये जमिनीपासून केवळ 400 मिमी उंचीचा अल्ट्रा-लो फ्लोअर देण्यात आला आहे. त्यामुळे दिव्यांग प्रवासी, विशेषतः व्हीलचेअर वापरणाऱ्या नागरिकांना बसमध्ये चढणं-उतरणं अधिक सोपे होणार आहे. सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी ही बस अधिक सुलभ आणि सुरक्षित असणार आहे.

बसमध्ये आधुनिक लिथियम आयर्न फॉस्फेट (LFP) बॅटरी तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. याशिवाय फुल एअर सस्पेन्शन सिस्टीम आणि फास्ट डीसी चार्जिंगची सुविधा असणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेलाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. प्रत्येक बसमध्ये 360 अंश सीसीटीव्ही कॅमेरे, इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) आणि बॅटरीच्या भागात आग लागल्यास ती तातडीने ओळखून नियंत्रणात आणणारी फायर डिटेक्शन अँड सप्रेशन सिस्टीम बसवण्यात येणार आहे.

या प्रकल्पांतर्गत ग्रीनसेल मोबिलिटी कंपनीकडून 31 पेक्षा अधिक प्रवासी क्षमता असलेल्या 1,050 EKA इलेक्ट्रिक बस पुरवल्या जाणार आहेत. तर साई ग्रीन कंपनी 33+1 बसण्याची क्षमता असलेल्या 450 Switch EiV9 इलेक्ट्रिक बस पुरवणार आहे.

या सर्व 1,500 बस चार टप्प्यांत बेस्टच्या ताफ्यात दाखल केल्या जातील. पहिल्या टप्प्यात 225, दुसऱ्या टप्प्यात 375, तिसऱ्या टप्प्यात 450 आणि चौथ्या टप्प्यात आणखी 450 बस विविध बेस्ट डेपोंमध्ये पाठवण्यात येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com