

नवरात्रोत्सवासाठी तुळजाभवानीची ज्योत आणताना भाविकांवर काळाचा घाला
संभाजीनगरच्या कचनेर फाट्याजवळ टेम्पोची दुचाकीला धडक
धुळे-सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला
या अपघातामध्ये तीन भाविकांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी भयंकर घटना घडली. तुळजाभवानी देवीची ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर ज्योत घेऊन जाणारा तरुण गंभीर जखमी झाला. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कचनेर फाट्याजवळ हा अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे, टेम्पो चालकाने दुचाकी २ किलोमीटरपर्यंत फरफटत नेली. संभाजीनगर पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूर येथून आई तुळजाभवानीची ज्योत घेऊन आपल्या गावी परतणाऱ्या भाविकांसोबत भयंकर घडलं. देवीची ज्योत घेऊन येत असातना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कचनेर फाट्याजवळ टेम्पोने दुचाकीला चिरडलं. या अपघातामध्ये ३ तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी झाला. संभाजीनगर जिल्ह्यातील गोळेगाव गदाना या गावातील हे भाविक होते. गाव अवघ्या ४० ते ५० किलोमीटर अंतरावर राहिले होते त्याआधीच या भाविकांवर काळाने घाला घातला. तरुणांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी सांगितले की, शनिवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात अक्षय बिजलसिंग राजपूत (वय २८ वर्षे, अमोल अशोक औटे (वय ३२ वर्षे) आणि गोरख रावसाहेब म्हसकर (वय २८ वर्षे) या तरुणांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. देवीची ज्योत घेऊन जाणारा शुभम आधाने (वय २० वर्षे) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर दुचाकी आयशरला अडकून २ किलोमीटरपर्यंत फरफटत गेली.
या अपघातानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. स्थानिकांनी पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.