

can daughter in law claim share in father in law property : सासरची संपत्ती म्हणजे जावई अथवा सुनेचा अधिकार, असा तुमचा समज असेल तर आताच सावध व्हा. कारण कायद्याच्या भाषेत 'वडिलोपार्जित' आणि 'स्वत: कमावलेली' मालमत्ता यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. पण सोलापूरमधील एका प्रकारामुळे हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. प्रसिद्ध डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर डॉक्टराच्या पत्नीने सूनेला घराबाहेर हाकलले, त्यात नवराही तिला घरात घ्यायला तयार नव्हता. त्यामुळे पती आणि सासरच्या संपत्तीत हक्क मिळावा म्हणून डॉक्टर सूनेने कायदेशीर लढाईचा निर्णय घेतला.
पण नवरा जिवंत असताना सून सासऱ्याच्या वडिलोपार्जित संपत्तीत हक्क सांगू शकत नाही. स्वत:च्या पैशातून घेतलेली संपत्ती वाटपाचा अधिकार सासू-सासऱ्यालाच आहे. त्यामुळे सासऱ्याच्या संपत्तीत नव्हे तर पतीला मिळालेल्या हिश्श्यात किंवा त्याच्या संपत्तीत सून (महिला) हक्क मागू शकते, असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे सासरच्या संपत्तीत सूनेला हक्क मिळत नाही.
वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे नक्की काय?
स्वतः कमावलेली आणि वडिलोपार्जित असे संपत्तीचे दोन प्रकार असतात. वडिलांकडून, आजोबांकडून किंवा पणजोबांकडून वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता ही 'वडिलोपार्जित' समजली जाते. अशा मालमत्तेवर त्या व्यक्तीचा हक्क जन्मतःच प्राप्त होतो. जर एखाद्या कुटुंबात तीन मुले असतील तर पहिल्या टप्प्यात या संपत्तीचे समान वाटप केले जाते. त्यानंतर तिसर्या पिढीतील नातवंडांना या मालमत्तेतील वाटा हा त्यांच्या वडिलांच्या हिश्श्यातून प्राप्त होतो. वडिलोपार्जित संपत्तीबाबत वडिलांना पूर्णपणे स्वतःच्या मर्जीने ती कोणत्याही एका वारसाच्या नावावर करण्याचा अधिकार नसतो. तसेच, कुटुंबातील कोणताही एक वारस इतर सर्व वारसांच्या लेखी संमतीशिवाय अशी मालमत्ता विकू शकत नाही, असा कायदेशीर नियम आहे.
सासऱ्यांच्या मालमत्तेवर जावयाचा हक्क असतो का?
सासरे आणि जावयातील नातेसंबंध वडील-मुलाचे मानले जाते. पण हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार सासू किंवा सासऱ्यांच्या संपत्तीवर जावयाचा कोणताही कायदेशीर हक्क नसतो. सासू किंवा सासऱ्यांनी कमावलेली मालमत्ता कोणाला द्यायची, हा संपूर्ण अधिकार फक्त त्यांचाच असतो. पत्नीच्या संमतीशिवाय किंवा सासू-सासऱ्यांच्या इच्छेशिवाय जावई त्या संपत्तीवर हक्क सांगू शकत नाही. पत्नीला वारसा हक्काने तिच्या वडिलांकडून काही मालमत्ता मिळाली असेल तरच त्यावर जावयाचा अधिकार असतो.
सासरच्या मालमत्तेवर सुनेचा अधिकार किती?
आई-वडिलांच्या इस्टेटवर मुलाचा हक्क हा नैसर्गिक असतो. पण जर मुलाचा मृत्यू झाला, तर त्याच्या पत्नीला त्या संपत्तीत हिस्सा मागता येतो का? हा कळीचा मुद्दा आहे. वास्तविक पतीच्या वाट्याला येणाऱ्या पूर्वजांच्या (वडिलोपार्जित) मालमत्तेवर त्याच्या पत्नीचा अग्रहक्क असतो. जर सासरची मालमत्ता ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली असेल, तर पतीच्या निधनानंतर त्याची पत्नी (सून) त्या भागावर आपला कायदेशीर दावा सिद्ध करू शकते. पण यात एक महत्त्वाची अट आहे. ती मालमत्ता सासू-सासऱ्यांनी स्वतःच्या कष्टातून किंवा पैशातून खरेदी केलेली नसावी. सासू-सासऱ्यांच्या स्वकष्टार्जित (स्वतः विकत घेतलेल्या) मालमत्तेवर सुनेला कोणताही कायदेशीर अधिकार सांगता येत नाही. अशी स्वतःची मालमत्ता कोणाला विकायची किंवा कोणाच्या नावावर मृत्युपत्र करायचे, याचा संपूर्ण अधिकार सासू-सासऱ्यांचाच असतो.
वडिलोपार्जित मालमत्तेचा नियम काय आहे ?
एखादी व्यक्ती मृत्युपत्र (Will) न करता मरण पावते, तेव्हा 'हिंदू वारसा कायदा- १९५६' च्या कलम ८ नुसार, त्या व्यक्तीच्या इस्टेटचे वाटप त्याच्या 'वर्ग १' मधील कायदेशीर वारसांमध्ये केले जाते. या वारसांमध्ये मृत व्यक्तीचा मुलगा, मुलगी, पत्नी आणि आई यांचा समावेश असतो आणि या सर्वांना त्या मालमत्तेत समसमान हिस्सा मिळतो.
यात नातवंडांच्या हक्काबाबत एक महत्त्वाची तरतूद आहे. जोपर्यंत नातवंडांचे आई किंवा वडील (जे वर्ग १ चे वारस आहेत) जिवंत आहेत, तोपर्यंत नातवंडांचा त्या मालमत्तेत थेट कोणताही अधिकार नसतो. म्हणजेच, जोपर्यंत वर्ग १ चे वारस हयात आहेत, तोपर्यंत नातवंडे वारसदार ठरू शकत नाहीत. पण जर आजोबांच्या हयातीतच त्यांच्या मुलाचा किंवा मुलीचा मृत्यू झाला असेल, तर मात्र आजोबांची ती संपत्ती वारसाहक्काने थेट नातवंडांकडे सोपवली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.