महामेरू हरपला! माजी खासदार डॉ. जेएम वाघमारे यांचे निधन

Dr JM Waghmare death : लातूरच्या शैक्षणिक क्रांतीचे शिल्पकार आणि माजी खासदार डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांचे ९१ व्या वर्षी निधन झाले. शिक्षण, साहित्य आणि समाजकारणात मोठे योगदान देणाऱ्या या ज्येष्ठ विचारवंतांना राज्यभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.
Dr JM Waghmare death
Dr JM Waghmare death
Published On

Dr JM Waghmare death : थोर विचारवंत, निष्ठावान साहित्यिक आणि लातूरच्या शैक्षणिक क्रांतीचे शिल्पकार डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांचे निधन झाले. ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाघमारे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून त्यांनी विद्यापीठाचा पाया रचण्यात मोलाची भूमिका बजावली होती. केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर राजकारणातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता.

शिक्षण आणि साहित्याच्या क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. जनार्दन वाघमारे यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३४ रोजी झाला होता. त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून पदवी (BA) घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एम.ए. पूर्ण केले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पीएच.डी.सह एल.एल.बी. आणि एल.एल.एम. सारख्या कायद्याच्या पदव्याही मिळवल्या. त्यांना पंजाबी विद्यापीठ, पटियाला तर्फे 'डी.लिट' ही सर्वोच्च पदवी देऊन सन्मानित करण्यात आले होते.

वाघमारे यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून दिल्लीत मराठवाड्याचे प्रश्न प्रभावीपणे मांडले होते. 'लातूर पॅटर्न'चे जनक मानले जाणाऱ्या डॉ. वाघमारे यांनी आयुष्यभर सामाजिक समता आणि शैक्षणिक गुणवत्तेचा ध्यास धरला. त्यांच्या निधनामुळे सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. शिक्षण, राजकारण, समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक दुवा निखळला, असा शोक मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

Dr JM Waghmare death
Ajit Pawar : उत्तरे मिळायला हवीत! अजित पवार विमान अपघात अहवालावर जय पवार नाराज, स्पष्ट शब्दात म्हणाले...

मुख्यमंत्री काय म्हणाले ?

विद्वत्ता, तत्वनिष्ठ आणि, लोकाभिमुखता यांचा त्रिवेणी संगम असलेल्या माजी खासदार प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक असा दुवा निखळला आहे, अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, प्रा. डॉ. वाघमारे यांचा इंग्रजी भाषा आणि साहित्यासह अर्थशास्त्र, राज्यशास्त्राचा गाढा अभ्यास होता. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अध्यापन आणि प्रशासन या अंगाने मोठा ठसा उमटवला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी प्रभावी कार्य केले. विशेष म्हणजे त्यांनी लातूरचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्षपदही भुषविले. या काळात त्यांनी शहराच्या विकासासाठी लातूर व्हिजन म्हणून आराखडा तयार केला. शहरातील स्वच्छता, पाणी पुरवठा तसेच नागरी सुविधांसाठी प्रयत्न केले. त्यामुळे लातूरला तत्कालीन संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात प्रथम पुरस्कार देखील मिळाला होता. राज्यसभा सदस्य म्हणूनही त्यांनी विविध संसदीय समितीवर काम केले. लातूरचे किल्लारी भूकंपशास्त्र संशोधन आणि नांदेड - किनवटच्या आदिवासी संशोधन आणि अभ्यास केंद्रांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. त्यांना संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात भारताचे प्रतिनिधी मंडळाचा सदस्य म्हणून म्हणणे मांडण्याची संधी मिळाली होती. त्यांनी वैविध्यपूर्ण विषयांवर विपुल साहित्य निर्मिती केली. त्यांची ही ग्रंथसंपदा आपल्या सर्वांसाठी एक प्रकारचे संचित आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक असा दुवा निखळला आहे. ही सामाजिक क्षेत्राची हानी आहे. आम्ही वाघमारे कुटूबिंयाच्या दुःखात सहभागी असून, ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी अशी प्रार्थना करतो असे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, माजी कुलगुरू, माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Dr JM Waghmare death
Sanju Samson : सूर्याने उडवली होती थट्टा, आता संजूने मैदानातच जिरवली,सूर्यकुमार यादवचा'तो' जुना व्हिडिओ झाला व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com