संजय महाजन, साम टीव्ही
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात एका बोगद्याजवळील मंदिरातील ५५ वर्षीय पूजाऱ्याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत पूजाऱ्याचे नाव संतोष रघुवीर मंचल असून, त्यांच्या डोक्यावर टणक वस्तूने वार करून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी सकाळी कुटुंबीयांना मंदिरात त्यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला.
माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक आणि ठसे तज्ज्ञांच्या पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली असून हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून या घटनेमुळे भुसावळ परिसरात खळबळ उडाली आहे. भुसावळ शहरातील झेडटीएस परिसरातील रेल्वे रुळाजवळ असलेल्या कालीका माता मंदिराच्या ओट्यावर राहणारे संतोष रघुवीर मंचल (वय ५५) यांचा अज्ञात व्यक्तीने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष मंचल यांना दारूचे व्यसन असल्याने ते कुटुंबापासून वेगळे राहत होते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते झेडटीएस परिसरातील कालीका माता मंदिरात वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा अधूनमधून त्यांची भेट घेत असे आणि जेवणाचा डबा देत असे. रविवारी (दि. २८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास नातेवाईकांनी त्यांना मंदिराच्या ओट्यावर बसलेले पाहिले होते.
सोमवारी सकाळी सुमारे ९.१९ वाजता मित्र इमरान खान याने संतोष मनचल यांची प्रकृती बिघडल्याची माहिती त्यांच्या मुलाला फोनवरून दिली. त्यानंतर मुलगा मंदिरात पोहोचला असता संतोष मनचल हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्त्राव होत होता, जबडा सुजलेला होता. तसेच छातीवर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. त्यानंतर ११२ वर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलविला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.