योगेश काशिद, बीड प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी
Beed latest crime news : बीड शहरात एका दुकानात काम करणाऱ्या उमेश दळवी या तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हा तरुण बीड शहरातील एका गरीब कुटुंबातील असून, या दलित तरुणाला दोरीने बांधून मारहाण करत त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
धक्कादायक म्हणजे मारहाण होण्यापूर्वी या तरुणाने आपल्या पत्नीला फोन करून, "मला या ठिकाणी मारणार आहेत," अशी भीती व्यक्त केली होती. तरुण ज्या दुकानात काम करत होता, त्याच ठिकाणी त्याला बेदम मारहाण करून त्याचा जीव घेण्यात आल्याचे आता समोर आले आहे. दरम्यान, मारहाण होण्यापूर्वी रात्री ८ वाजता उमेशने आपल्या पत्नीला फोन करून जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. त्यानंतर रात्री ३ वाजता दुकानदारांनी पत्नीला फोन करून 'उमेशची तब्येत बिघडली आहे' असे सांगत रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
'मला मारणार आहेत...' मृत्यूपूर्वी पत्नीला केला होता फोन!
"माझा पती त्या दारूच्या दुकानावर काम करत होता. रात्री आठच्या सुमारास त्यांनी मला फोन करून सांगितले की, मला इथे मारहाण करणार आहेत. मी घरात लहान मुलांसह एकटीच होते. या लोकांनी आमची सर्व मालमत्ता (प्रॉपर्टी) काढून घेतली आहे. त्यानंतर रात्री तीन वाजता मला फोन आला की, तुमच्या पतीची तब्येत बिघडली असून त्यांना दवाखान्यात दाखल केले आहे. पण प्रत्यक्षात त्यांनी माझ्या पतीचा जीव घेतला आहे. त्यांना अजिबात सोडू नका, कडक शिक्षा करा," अशी आर्त हाक मृत उमेशच्या पत्नीने दिली आहे.
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. आरोपींवर खुनासह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोरीने बांधून, अमानुष मारहाण करत खून केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर बीडमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही काळापूर्वी घडलेल्या संतोष देशमुख प्रकरणाची आठवण ताजी झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.