रुपाली बडवे, साम प्रतिनिधी
मुंबई: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवरुन महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. अजित पवार गटही मुंबई किंवा कोकण पदवीधर मतदारसंघात आपला उमेदवार उभा करणार आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मुंबईत भाजपने उमेदवार दिलाय त्यात आता अजित पवार गटदेखील आपला उमेदवार देणार असल्याची चर्चा असल्यानं वाद होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यात, शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी येत्या २६ जून रोजी मतदान होणार आहे. तर १ जुलैला मतमोजणी होणार आहे.
आज अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक झाली त्या बैठकीत पदवीधर निवडणूक लढवण्याबाबत अनेकांनी इच्छा व्यक्त केली. उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीकडून मुंबई किंवा कोकण पदवीधर मतदारसंघात आपला उमेदवार देणार असल्याची शक्यता आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव नलावडे उद्या सकाळी १० वा आपला उमेदवारी अर्ज कोकण भवन येथे दाखल करणार आहेत. दरम्यान भाजपने किरण रवींद्र शेलार यांना मुंबई पदवीधर, निरंजन डावखरे कोकण पदवीधर आणि शिवनाथ दराडे यांना मुंबई शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलीय.
आचारसंहिता संपुष्टात पण...
लोकसभेच्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगामार्फत देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली होती. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याची माहिती भारत निवडणूक आयोगाने राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत दिलीय.
दरम्यान राज्यात मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई, कोकण आणि नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू राहणार असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.