भरत मोहळकर, साम प्रतिनिधी
लोकसभेचा निकाल जाहीर झालाय. यात शिंदे गटाला 15 पैकी 7 जागाच राखण्यात यश मिळालंय. मात्र शिंदे गटाच्या कमी झालेल्या जागांसाठी शिंदे गटाने भाजपला जबाबदार धरलंय. सर्व्हेच्या नावानं काही जागा बदलण्यात आल्या. त्याचा फटका शिंदे गटाला बसल्याचा थेट आरोपच शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी केलाय.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर 13 खासदार हे एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. यापैकी निम्मे खासदार निवडून येणार नसल्याचं भाजपच्या सर्व्हेत सांगण्यात आले होतं. त्यामुळे शिंदे गटावर विद्यमान खासदारांच्या तिकीटाला कात्री लावण्याची नामुष्की ओढावली. त्याचा फटका शिंदे गटाला बसल्याची चर्चा रंगलीय.
रामटेकमधून कृपाल तुमाने यांचं तिकीट कापलं.
यवतमाळ-वाशिममधून भावना गवळींच्या उमेदवारीला कात्री
हिंगोलीत हेमंत पाटील यांचं तिकीट बदललं गेलं.
नाशिकमध्ये हेमंत गोडसेंना अखेरच्या दिवसांत उमेदवारी जाहीर करण्यात आली.
दक्षिण मुंबईत यामिनी जाधवांची उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाला.
शिर्डीत सदाशिव लोखंडेच्या उमेदवारीलाही उशीर करण्यात आल्याचा फटका बसला.
शिंदे गटाच्या उमेदवारांच्या विरोधात वातावरण असल्याचं सांगत त्यांचं तिकीट कापलं गेलं. खासदारांचं तिकीट कापण्यात आल्यानं आमदारांमध्येही तिकीट काटलं जाण्याची धाकधूक होती. त्याचाही फटका बसलाय. भाजपचे दोनच विद्यमान खासदार निवडून आले. त्यामुळे सर्व्हेवरून खदखद समोर येण्यास सुरुवात झालीय. त्यामुळे यावरून महायुतीत वाद रंगण्याची चिन्ह आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.