विकास मिर्गनी
माथेरानच्या निसर्गरम्य घाटात विकेंडचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना रविवारी सकाळी एका थरारक प्रसंगाचा सामना करावा लागला. जुमापट्टी रेल्वे स्थानक परिसरात एक मारुती वॅगनआर कार थेट मिनी ट्रेनच्या रेल्वे रुळांवर कोसळली. विशेष म्हणजे, त्याचवेळी पर्यटकांनी खचाखच भरलेली मिनी ट्रेन स्थानकात उभी होती. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पर्यटकांमध्ये घबराट पसरली. सुदैवाने कारमधील पाचही जण सुरक्षित असल्याने मोठा अनर्थ टळला.
रविवारच्या सुट्टीमुळे माथेरानमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास जुमापट्टी परिसरात ही घटना घडली. कर्जत तालुक्यातील भिवपुरी डीक्सल येथील सूरज पटेल हा तरुण आपल्या मित्र-मैत्रिणींसह माथेरान घाटात फिरण्यासाठी आला होता. थंडगार वाऱ्याचा आनंद घेण्यासाठी त्यांनी जुमापट्टी परिसरातील रेल्वे रुळांजवळ असलेल्या उंच मोकळ्या जागेत आपली मारुती वॅगनआर कार उभी केली होती.
मात्र, काही वेळातच ही कार अचानक घसरून थेट मिनी ट्रेनच्या रेल्वे रुळांवर कोसळली. त्यावेळी स्थानकात पर्यटकांनी भरलेली मिनी ट्रेन उभी असल्याने प्रसंगाचे गांभीर्य वाढले. कार रुळांवर पडल्याचे दिसताच पर्यटकांच्या काळजाचा ठोका चुकला. रेल्वे रुळांवर अडथळा निर्माण झाल्यामुळे मिनी ट्रेनची वाहतूक काही काळासाठी थांबवावी लागली.
या घटनेमुळे सुमारे पाच मिनिटे मिनी ट्रेन रखडली. कारमध्ये तीन तरुणी आणि दोन तरुण असे एकूण पाच जण होते. सुदैवाने या सर्वांना कोणतीही दुखापत झाली नाही. त्यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला. माथेरानसारख्या पर्यटनस्थळी रेल्वे रुळांजवळ वाहन उभे करताना आवश्यक खबरदारी घेण्याचे महत्त्व या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.