विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा आणि प्रतिष्ठेची लढत कुठे होणार असेल तर ते आहे,चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ. ग्रामीण भागातील सर्वाधिक मतदार असलेल्या या मतदारसंघात महाविकास आघाडी सरशी करणार की महायुती आपला गड राखणार याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.राज्यातील बदलेल्या सत्ता चित्राप्रमाणे या मतदारसंघात देखील मोठी उलटफेर झालीय. त्यामुळे मंगेश चव्हाण यांना पुन्हा आमदारकी राखता येणार की नाही हे पाहावं लागेल.
विधानसभा निवडणुकांसाठी काही महिने शिल्लक असतानाच मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आलाय. विधानसभेच्या लढाईत कोण बाजी मारणार याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.सध्याच्या घडीला भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनाच तिकीट मिळेल,अशी चर्चा असली तरी महायुतीत साथीदार असलेल्या शिंदे गटामुळे मंगेश चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याबाबत शंका उपस्थितीत होत आहे. तर मविआसाठी येथील उमेदवारीचा मार्ग मात्र सरळ आणि साफ दिसत आहे.
मविआकडून उन्मेष पाटील हे उमेदवार राहतील,असा अंदाज आहे. पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला सोड चिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे ते या विधानसभेत उमेगदवारी मागतील. उन्मेष पाटील यांना मागणारा एक गट असल्याने त्यांच्या विजयाची देखील आशा असल्याचं सकाळ वृत्तसमुहाचे उपसंपादक आनन शिंपी म्हणतात.
राज्यातील राजकारणात घडलेल्या घडामोडी आणि भाजपमधील अंतर्गत कलहामुळे चाळीसगाव मतदारसंघ महायुतीसाठी थोडं डोकेदुखी देणारं ठरणार आहे. उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला तरी जनतेच्या मनात काय आहे आणि ते कोणाच्या पारड्यात सत्ता देणार हे निकालानंतरच कळणार आहे.चाळीसगाव मतदारसंघात ग्रामीण भागातील अधिक मतदार आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील विकास तेथील लोकांच्या अडचणी दूर करणारा नेताच आमदारकी भूषवणार यात शंका नाही. ही बाब लक्षात घेत मंगेश चव्हाण यांनी आपल्या मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावलाय.
विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याच्या आधीपासूनच त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि विकासकामे पूर्ण करण्याकडे लक्ष ठेवलंय.उमेदवारी मिळवण्यासाठी जेथे महायुतीला बैठकांवर बैठका घ्याव्या लागणार आहेत, त्याचजागी मविआत पाटील यांच्या नावावर पसंती मिळण्याची शक्यता आहे. महायुतीसाठी मात्र जरा येथील जागावाटप किंवा उमेदवारीवरुन रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. जागावाटपात ही जागा शिंदे गटाकडे गेली तर चव्हाण यांना कदाचित जागा सोडावी लागेल.
हा निर्णय हा त्यांना किती रुचेल हे पाहावं लागेल, असेच चित्र राहिले तर भाजप सोडून शिंदे गटात गेलेले उन्मेष पाटील आणि मविआचे उमेदवार राजीव देशमुख यांच्या लढत होण्याची शक्यता आहे. पण जर मेरिट म्हणजेच विकासकामांवरुन उमेदवारी देण्याचं ठरलं तर मंगेश चव्हाण हेच महायुतीचे उमेदवार राहतील.
मंगेश चव्हाण यांनी अनेक विकासकामे केली आहेत.सिंचनाच्यादृष्टीने त्यांनी अनेक प्रकल्पांसाठी निधी मिळवलाय. यातील सर्वात चर्चेतील आणि अनेक खेड्यातील पाणी प्रश्न सोडवणारा प्रकल्प त्यांनी मंजूर करून आणलाय.वानखेडे-लोंढे या प्रकल्पामुळे खेड्यापाड्यातील मते हे चव्हाण यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर मंगेश चव्हाण हे सामान्य नेता म्हणून ओळखले जातात,म्हणजे गावातील लोकांना मंगेश चव्हाण हे आपलाच नेता वाटतो. चव्हाण यांचा दांडगा जनसंपर्क आहे. वारकरी संप्रदायातील लोकांचा देखील त्यांना पाठिंबा आहे.प्रत्येक वर्षी ते आपल्या खर्चातून पंढरपूरला दिंडी पाठवत असतात.त्यातून त्यांची जनतेशी नाळ जोडली गेल्याचं पुण्यनगरी वृत्तसंस्थेचे उपसंपादक नरेंद्र देसले म्हणतात.
मंगेश चव्हाण विद्यमान आमदार असले तरी त्याचे कुटुंबीय आजही साधरण घरात राहतात. मंगेश चव्हाण यांचा हाच साधेपणा येथील जनतेला आणि गावातील लोकांना भावतो.त्यामुळे जास्त मतदार ग्रामीण भागातून असल्याने भाजप मंगेश चव्हाण यांच्या नावाचा विचार प्राधान्याने करतील.मात्र त्याचवेळी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप सोडून ठाकरे गटात गेलेले उन्मेष पाटील हे आघाडीकडून उमेदवारीसाठी दावेदार असतील.त्यामुळे चाळीसगाव विधानसभा निवडणुकीची लढत खूप रंजक होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाराज झालेले उन्मेष पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला. उन्मेष पाटील हे चाळीसगावमधून २०१४ ला आमदार म्हणून निवडून आले होते. २०१९ च्या निवडणुकीत पाटील यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटीवर विजयी होत खासदारकी भुषवली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.