Mahayuti Dispute : विधानसभेआधीच महायुती फुटणार? रायगडात पुन्हा उडाली वादाची ठिणगी, VIDEO

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीआधीच महायुतीत ठिणग्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे महायुती फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सचिन कदम | साम टीव्ही, रायगड

महाराष्ट्रात पुढील काही महिन्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांआधीच राजकीय फटाके फुटण्याची शक्यता आहे. एकीकडे वरिष्ठ पातळीवर जागावाटपासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. तर स्थानिक पातळीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. रायगड जिल्ह्यात तरी, तशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे दिसून येते. रायगडमधील शिवसेना आमदारांनी कर्जत येथील मेळाव्यात सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे किमान रायगडमध्ये महायुतीमध्ये फूट पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, असे बोलले जाते.

रायगड जिल्ह्यात महायुतीमधील वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. यापूर्वीही शिवसेना शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले होते. आता पुन्हा आक्रमक होत आरोपांची माळ लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात दगाबाजी करत असल्याचे थोरवे म्हणाले.

महायुतीचा घटकपक्ष आपल्या सरकारमधील निधी घेवून, आपल्याच सरकारच्या माध्यमातून विकासकामे करून आपल्यासोबतच दगा करत असल्याचा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. कर्जत येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

आमदार थोरवे भाषणावेळी कमालीचे आक्रमक झालेले दिसले. त्यावर त्यांचे सहकारी आणि मंत्री उदय सामंत यांनी थोरवे यांना सबुरीचा सल्ला दिला. शिकार टप्प्यात आला की वेध घ्या, असंही ते म्हणाले. यावेळी आमदार भरत गोगावलेही आक्रमक झाले होते. त्यामुळे किमान रायगडचं राजकीय रण तापण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये फूट पडते की काय? अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com