लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात आज पश्चिम बंगालमध्ये मतदान होत आहे. एकूण ९ जागांसाठी सकाळीपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. यादरम्यान, कोलकाता नॉर्थ लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान होत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे मतदान केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला.
तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवार तापस रॉय यांना घेराव घातला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. पोलिसांनी वेळीच मधस्थी करत हा वाद मिटवला. एएनआय या वृ्त्तसंस्थेने या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
भाजप नेत्यांकडून बोगस मतदान होत असल्याचा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दुसरीकडे भाजप उमेदवार तापस रॉय यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. या संपूर्ण प्रकारानंतर तापस रॉय यांनी एएनआयला प्रतिक्रिया दिली. "तृणमूल काँग्रेसचा पोलिंग एजंट मतदान केंद्रावर उपस्थित होता, मला बोगस मतदानाबाबत काहीच कल्पना नाही", असं रॉय यांनी सांगितलं.
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानापासूनच भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठे वाद होत आहेत. शनिवारी सातव्या टप्प्यातील मतदान सुरू होताच दक्षिण परागणा जिल्ह्यात भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा मोठा वाद झाला.
कुलताली येथील मतदान केंद्रावर काही पोलिंग एजंटना परवानगी नाकारण्यात आल्याने जमाव संतप्त झाला. यावेळी काहींनी मतदान केंद्रात घुसून निवडणूक कर्मचाऱ्यांन दमदाटी केली. इतकंच नाही, तर बूथ क्रमांक ४० आणि ४१ मध्ये घुसून ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन उचलून नेले आणि जवळच असलेल्या तलावात फेकून दिले. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.