पश्चिम बंगालसह ८ राज्यांत आज लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी अनेकजण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. अशातच दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
येथे संतप्त जमावाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन पाण्यात फेकून दिलं आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. पीटीआयच्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील २४ परागणा जिल्ह्यातील कुलताली येथे शनिवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली.
त्याचवेळी काही जणांनी बूथ क्रमांक ४० आणि ४१ येथील मतदान केंद्रात प्रवेश केला. आरोपींनी घोषणाबाजी करत निवडणूक अधिकाऱ्यांना दमदाटी केली. तसेच ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन उचलून नेले आणि जवळच असलेल्या तलावात फेकून दिले. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही पोलिंग एजंटना मतदान केंद्रात उपस्थित राहण्याची परवानगी नाकारण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी सेक्टर ऑफिसरने एफआयआर दाखल केला आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
सध्या सेक्टर अंतर्गत येणाऱ्या सहाही बूथवर मतदान प्रक्रिया अखंडितपणे सुरू आहे. नवीन ईव्हीएम आणि कागदपत्रे सेक्टर ऑफिसरला देण्यात आली आहेत. पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्यात ९ मतदारसंघात मतदान होत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पश्चिम बंगालमधील मतदानाची आकडेवारी वाढली आहे.
मात्र, पहिल्या टप्प्यापासून येथे हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशीच तृणमूल काँग्रेसने दावा केला होता की, भाजप कार्यकर्त्यांनी टीएमसीच्य अलीपुरद्वार तुफानगंज-2 ब्लॉकमधील पक्ष कार्यालयाला आग लावली होती. तेव्हा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.