

मधुमेह हा जीवनशैलीशी संबंधित आजार मानला जातो. आजकाल केवळ प्रौढ व्यक्ती नाही तर तरूणांमध्येही या आजाराचं प्रमाण पाहायला मिळतंय. त्यामध्ये टाइप 2 डायबिटीज हा सर्वाधिक आढळणारा प्रकार असून चुकीचा आहार, कमी शारीरिक हालचाल आणि बदललेली जीवनशैली ही त्यामागची प्रमुख कारणं आहेत. जगभरात लाखो लोक या आजाराने त्रस्त आहेत.
मात्र अनेकांना हे माहीत नसतं की, मधुमेहाची काही सुरुवातीची लक्षणं तुमच्या त्वचेवरही दिसू शकतात. ही लक्षणं जर तुम्ही वेळेत ओळखली तर रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणं आणि योग्य वेळी उपचार सुरू करणं सोपं जाऊ शकतं.
शरीरावर हळूहळू लहान तपकिरी रंगाचे डाग दिसू लागले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. काही प्रकरणांमध्ये हे डाग रक्तातील साखरेचं प्रमाण वाढत असल्याचा सुरुवातीचा इशारा असू शकतात. त्यामुळे अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मानेच्या मागील भागावर किंवा काखेत त्वचा काळी पडणं किंवा जाडसर दिसणं हे देखील एक मधुमेहाचं एक लक्षण असू शकतं. अशा प्रकारचा काळपटपणा हळूहळू वाढत जातो आणि वाढलेल्या ब्लड शुगरशी त्याचा संबंध असू शकतो.
त्वचेवर किंवा विशेषतः डोळ्यांच्या आसपास पिवळसर रंगाच्या छोट्या गाठी किंवा चरबीसारखे चट्टे दिसून आले तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे देखील मधुमेहाचा इशारा असू शकतात. यांना वैद्यकीय भाषेत झॅन्थोमा असं म्हणतात.
रक्तातील साखर जास्त असल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्वचा कोरडी, खरखरीत किंवा जाड झाल्यासारखी वाटू शकते. अशा बदलांकडेही गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
एखादी जखम, खरचटणं किंवा कापलेली जागा भरून यायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते देखील मधुमेहाचं लक्षण असू शकतं. कारण रक्तातील साखर वाढल्याने रक्ताभिसरण आणि शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमता कमी होऊ लागते. त्यामुळे जखम भरून येण्याची प्रक्रिया मंदावते.
काही लोकांना कोणतंही कारण नसताना त्वचेला वारंवार किंवा सतत खाज येण्याची समस्या जाणवते. हेही वाढलेल्या रक्तातील साखरेचं लक्षण असू शकतं. त्यामुळे अशी समस्या दीर्घकाळ जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.