Surabhi Jayashree Jagdish
सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी किंवा बंद होणं पण त्यावेळी तीव्र छातीत दुखणे यांसारखी नेहमीची लक्षणं स्पष्टपणे न दिसणं. अनेकदा व्यक्तीला फक्त थकवा, अपचन किंवा किरकोळ अस्वस्थता जाणवते आणि ती हार्ट अटॅकची लक्षणं आहेत हे लक्षात येत नाही.
हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी आणि कोलेस्ट्रॉल साचल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो, हे त्याचं मुख्य कारण आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, धूम्रपान, जास्त ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे सायलेंट हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
सायलेंट हार्ट अटॅक हा इतर हार्ट अटॅक इतकाच जीवघेणा ठरू शकतो कारण उपचार न झाल्यास हृदयाच्या स्नायूंचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. यामुळे हृदय निकामी होणे, धोकादायक हृदयाची अनियमित धडधड किंवा पुढे मोठा हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो.
सायलेंट हार्ट अटॅकच्या काही दिवसांपासून ते दोन आठवड्यांपर्यंत सतत थकवा जाणवू शकतो आणि साधी कामं करतानाही दम लागतो. पुरेशी झोप घेतल्यानंतरही शरीरात ऊर्जा नसल्यास हे दुर्लक्ष करू नये. विशेषतः महिलांमध्ये हे सुरुवातीचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं.
जिने चढताना, चालताना किंवा हलक्या हालचालींमध्येही श्वास घ्यायला त्रास होणं हे हृदयावरील ताणाचं लक्षण असू शकतं. काही लोकांना छातीत तीव्र वेदना नसतानाही फक्त दम लागण्याची समस्या जाणवते. अशी समस्या वारंवार होत असल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं आहे.
छातीत जडपणा, दडपण किंवा सौम्य वेदना जाणवणं अनेकदा गॅस किंवा अपचन समजून दुर्लक्षित केलं जातं. ही अस्वस्थता खांदे, पाठ, मान, जबडा किंवा हातापर्यंतही पसरू शकते. अशी लक्षणं वारंवार जाणवत असल्यास ती हृदयाशी संबंधित असू शकतात.
कोणतेही कष्टाचं काम न करता अचानक थंड घाम येणं हे हार्ट अटॅकचं महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. त्यासोबत मळमळ, उलटीसारखं वाटणं भावना किंवा चक्कर येण्याचा त्रासही जाणवू शकतो. अशी लक्षणे दिसल्यास वेळ न दवडता तातडीने रुग्णालयात जावं.