जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे 2 कोटी नवीन कॅन्सरच्या रुग्णांची नोंद होत आहे. कॅन्सर हा आजार नेमका कसा होतो आणि कशाने होतो याचा अजूनही पूर्ण उलगडा वैद्यकशास्त्राला झालेला नाही. तंबाखू आणि धूम्रपानाने तो होतो, हे सर्वश्रुत आहे. पण संशोधनामध्ये असे ही आढळून आले की कुठलेही व्यसन नसताना देखील कॅन्सर अनेकांना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पूर्वी कॅन्सर हा अपवादात्मक होता. पण दुर्दैवाची बाब अशी की कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे. कॅन्सर म्हटले की साहजिकच भीती वाटते. या आजाराला औषधोपचार जितके महत्वाचे आहे. तितकेच आपण मनाने ही खंबीर असले पाहिजे. मानसिकरीत्या न खचता या आजाराला सामोरे गेले तर नक्कीच कॅन्सर बरा होऊ शकतो आणि रुग्ण त्याचे जीवन पाहिल्यासारखे जगू शकतो.
SMBT हॉस्पिटलच्या मानसोपचार तज्ञ डॉक्टर कविता गडदे यांनी यावर सविस्तर माहिती दिली आहे. जागतिक कर्करोग दिनानिमित्त हा लेख लिहावा असे वाटले. आज अनेक कर्करोगतज्ज्ञ आणि वैद्यकीय मंचांवर हे मान्य केले जात आहे की कर्करोग हा फक्त शरीराचा आजार नाही, तर ती मनासोबत ही एक मोठी लढाई आहे. मात्र समाजामध्ये अजूनही कर्करोग मानसशास्त्र (Psycho-oncology) म्हणजे नेमके काय, आणि कर्करोग मानसशास्त्रज्ञ काय काम करतात, याबद्दल पुरेशी जागरूकता नाही.
पुढे त्या म्हणाल्या, कर्करोग मानसशास्त्रज्ञांचे काम फक्त रुग्णांशी “गप्पा मारणे” इतके मर्यादित नसते. ते रुग्णांच्या मानसिक ताणतणावांचे शास्त्रीय पद्धतीने मूल्यमापन करतात. रुग्णांच्या भावनिक प्रतिक्रिया, वागण्यातील बदल आणि विचारसरणी या सर्वांकडे ते चिकित्सक दृष्टीने पाहतात. कर्करोगाच्या आजारात रुग्णांमध्ये जैविक (Biological), मानसिक (Psychological) आणि सामाजिक (Social) अशा तिन्ही पातळ्यांवर मोठे बदल घडतात. या बदलांचा अभ्यास करून वर्तनात्मक, वैचारिक आणि भावनिक उपचार पद्धतींचा वापर केला जातो. ही प्रक्रिया पूर्णपणे वैज्ञानिक असून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आहे.
कर्करोगाचे निदान झाल्यानंतर बहुतांश रुग्णांना सर्वप्रथम existential crisis म्हणजेच अस्तित्वाशी संबंधित प्रश्नांचा सामना करावा लागतो. अनिश्चिततेचा सामना करताना असा मानसिक पेचप्रसंग निर्माण होतो. याच टप्प्यापासून रुग्णांचा प्रवास DABDA या दुःखाच्या पाच अवस्थांकडे सुरू होतो.
DABDA हे दुःखाच्या पाच अवस्थांचे संक्षिप्त रूप असून, ही संकल्पना मानसोपचारतज्ज्ञ एलिझाबेथ कुब्लर-रॉस यांनी १९६९ मध्ये मांडली.
अस्वीकार (Denial): आजाराचे वास्तव स्वीकारता न येणे.
राग (Anger): स्वतःवर, इतरांवर किंवा नशिबावर राग येणे.
तडजोड (Bargaining): जर असे झाले असते तर… अशा विचारांद्वारे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न.
नैराश्य (Depression): दुःख, एकटेपणा आणि निराशा.
स्वीकारणे (Acceptance): वास्तव स्वीकारून पुढील आयुष्याशी जुळवून घेणे.
या अवस्थांमधून जात असताना अनेक रुग्णांना आपण नेमक्या कोणत्या टप्प्यात आहोत, हेही कळत नाही. अशावेळी संरक्षण यंत्रणा (defense mechanisms) आणि सामना करण्याच्या यंत्रणा (coping mechanisms) सक्रिय होतात.
या संकल्पनांचे योग्य मानसिक शिक्षण देणे हे कर्करोग मानसशास्त्रज्ञांचे महत्त्वाचे काम असते. रुग्ण आणि नातेवाईकांचा अस्वीकारापासून स्वीकारापर्यंतचा प्रवास इथून सुरू होतो.
यानंतर प्रत्यक्ष वैद्यकीय उपचारांचा टप्पा येतो—शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन. या उपचारांचे सकारात्मक परिणाम जसे आहेत, तसेच शारीरिक दुष्परिणामही असतात. त्याचा परिणाम मनावरही होतो. शरीराच्या दिसण्यात होणारे बदल, कर्करोग पुन्हा होण्याची भीती, जीवनाच्या गुणवत्तेबद्दलची चिंता, नैराश्य, सततची असुरक्षितता, नात्यांबाबतची साशंकता आणि लोकांची अनुकंपा—या सर्व गोष्टींना सामोरे जाण्यासाठी औषधांपेक्षा मानसिक कणखरपणा अधिक गरजेचा ठरतो.
संशोधनात हे स्पष्टपणे दिसून आले आहे की उपचारादरम्यान अनेक मानसिक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे सुरुवातीला Distress Thermometer सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त स्क्रीनिंग चाचण्या वापरल्या जातात. त्यानंतर विविध मानसशास्त्रीय चाचण्यांच्या आधारे रुग्णाची भावनिक आणि मानसिक स्थिती तपासली जाते. कर्करोगाच्या उपचारप्रवासात मानसिक उपचार ही एक मोठी देणगी आहे. ती रुग्णांना स्वतःशी, परिस्थितीशी आणि आयुष्याशी अधिक सक्षमपणे सामना करण्याची ताकद देते.
आज कर्करोग उपचारात मानसशास्त्र ही ठराविक लोकांसाठी नसून मूलभूत गरज आहे. योग्य वेळी मानसिक आधार मिळाल्यास उपचारांचा प्रवास अधिक सुसह्य, वास्तववादी आणि सकारात्मक होऊ शकतो. कर्करोगाशी लढताना शरीरासोबत मनालाही उपचारांची गरज आहे, हे समाजाने स्वीकारणे हीच खरी जागरूकतेची सुरुवात ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.