

घरातील स्वयंपाकघर म्हणजे फक्त जेवण बनवण्याची जागा नाही. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघराला घरातील सकारात्मक ऊर्जेचं महत्त्वाचं केंद्र मानलं जातं. स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तूला विशेष महत्त्व असल्याचं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं. यामध्ये चाकूचाही समावेश होतो. भाजी कापण्यासाठी रोज वापरला जाणारा चाकू हा वास्तुशास्त्रानुसार मंगळ ग्रहाचं प्रतीक मानला जातो.
वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, चाकू योग्य दिशा आणि योग्य पद्धतीने ठेवल्यास तो ऊर्जा आणि धैर्याचं प्रतीक ठरतो. पण चाकू चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास किंवा त्याची योग्य काळजी न घेतल्यास घरात नकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकतं, असं मानलं जातं.
ज्योतिषाचार्य तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या मते, स्वयंपाकघराच्या मुख्य दरवाजाच्या अगदी वर भगवान शंकराच्या हातून माता अन्नपूर्णा अन्नदान करत असल्याचा फोटो लावावा. त्याचप्रमाणे स्वयंपाकघर हे अग्निकुंडाच्या दिशेला असावं. याशिवाय स्वयंपाकघरात शून्य वॅटचा लाल बल्ब लावण्याचाही सल्ला त्यांनी दिलाय.
वास्तुशास्त्रानुसार, मंगळ ग्रहाची दिशा दक्षिण मानली जाते. त्यामुळे स्वयंपाकघरात चाकू दक्षिण किंवा दक्षिण-पूर्व दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं. या दिशेला चाकू ठेवल्याने व्यक्तीला स्वतःचा राग आणि ऊर्जेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे चाकूचा वापर फक्त गरजेच्या कामांसाठीच होतो, असंही सांगितलं जातं.
दुसरीकडे, उत्तर किंवा ईशान्य दिशेला चाकू ठेवणं शुभ मानलं जात नाही. या दिशांचा संबंध बुध ग्रहाशी जोडला जातो. या ठिकाणी चाकू ठेवल्यास घरातील सुख-शांतीवर परिणाम होऊ शकतो. तसंच कुटुंबातील सदस्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं.
चाकू कोणत्या प्रकारचा आहे आणि त्याची रचना कशी आहे, यालाही वास्तुशास्त्रात महत्त्व दिलं जातं. स्वयंपाकघरासाठी स्टीलचा चाकू सर्वात योग्य मानला जातो. चाकूचं हँडल लाकडाचं असेल तर ते अधिक शुभ मानलं जातं.
पण प्लास्टिकच्या हँडलचा चाकू खरेदी करताना त्याचा रंग काळा नाही ना, याची काळजी घ्यावी. काळा रंग नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे काळ्या रंगाच्या हँडलचा चाकू वापरणं टाळण्याचा सल्ला दिला जातो.
वास्तुशास्त्रानुसार, चाकू कधीही उघड्यावर ठेवू नये. चाकू सतत नजरेसमोर राहिल्यास घरातील वातावरणात तणाव आणि चिडचिड वाढू शकते, अशी मान्यता आहे. त्यामुळे चाकू नेहमी ड्रॉवरमध्ये किंवा बंद जागेत सुरक्षित ठेवावा. विशेषतः स्वयंपाक झाल्यानंतर चाकू किचनच्या ओट्यावर उघडा ठेवू नये.
चाकू वापरल्यानंतर तो स्वच्छ धुणंही महत्त्वाचं मानलं जातं. वापर झाल्यानंतर लगेच चाकू धुऊन स्वच्छ जागी ठेवावा. घाण झालेला चाकू सिंकजवळ किंवा गॅस शेगडीच्या बाजूला ठेवणं शुभ मानलं जात नाही. असं केल्याने आरोग्याच्या समस्या वाढू शकतात आणि विनाकारण खर्चही होऊ शकतो, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.