

हाय कोलेस्ट्रॉलला अनेकदा ‘सायलेंट किलर’ म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं तरी सुरुवातीला त्याची ठोस लक्षणं सहज दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेकांना ही समस्या आहे, याची कल्पनाच नसते. मात्र काही वेळा शरीरात होणारे काही बदल तुम्हाला संकेत देत असतात. चेहरा आणि डोळ्यांच्या आसपास दिसणारे काही बदलही त्यापैकी एक असू शकतात.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की त्याचे संकेत चेहऱ्यावर दिसून येतात. ही लक्षणं ओळखून तुम्ही वेळीच उपचार घेतले पाहिजेत. हे संकेत नेमके कोणते असतात ते जाणून घेऊया.
डोळ्यांच्या कोपऱ्याजवळ किंवा पापण्यांच्या आसपास पिवळसर डाग दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. या अवस्थेला जॅन्थेलाझ्मा म्हणतात. त्वचेखाली चरबी आणि कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे असे डाग दिसू शकतात. काही लोकांमध्ये हे रक्तातील कोलेस्ट्रॉल किंवा इतर चरबीचं प्रमाण वाढल्याचे संकेत असू शकतात.
काही लोकांच्या डोळ्याच्या बुबुळाभोवती पांढऱ्या किंवा करड्या रंगाची वर्तुळ दिसून येतं. याला आर्कस सेनिलिस (Arcus Senilis) म्हणतात. वय वाढल्यानंतर हा त्रास दिसणं सामान्य असू शकतं. मात्र कमी वयात म्हणजेच 40 वर्षांपूर्वी अशी रिंग दिसत असेल तर रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि इतर चरबीचं प्रमाण तपासून घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
चेहरा नेहमीपेक्षा फिकट, थकलेला किंवा सुजल्यासारखा दिसत असेल तर त्यामागे अनेक कारणं असू शकतात. केवळ चेहऱ्याचा रंग किंवा थकवा पाहून हाय कोलेस्ट्रॉल असल्याचं ठामपणे सांगता येत नाही. मात्र शरीरात रक्ताभिसरणाशी संबंधित समस्या किंवा इतर आरोग्याच्या तक्रारी असतील तर अशा बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं.
ओठांचा रंग फिकट, पांढरट किंवा निळसर दिसू लागला तर त्यामागे रक्ताभिसरणाशी संबंधित कारणं असू शकतात. मात्र हा बदल थेट हाय कोलेस्ट्रॉलमुळेच होतो असं मानता येत नाही. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा थर जमा होऊन त्या अरुंद होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे ओठांच्या रंगात सतत बदल दिसत असेल किंवा त्यासोबत इतर त्रास जाणवत असतील तर वैद्यकीय तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे.
डोळ्यांमध्ये सतत जळजळ, थकवा किंवा जडपणा जाणवत असेल तर त्याची अनेक कारणं असू शकतात. स्क्रीनकडे जास्त वेळ पाहणं, डोळ्यांचा कोरडेपणा, झोपेची कमतरता किंवा इतर डोळ्यांच्या समस्या यामुळेही असा त्रास होऊ शकतो. मात्र हा त्रास जर तुम्हाला सतत होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं चांगलं.
चेहरा किंवा डोळ्यांमध्ये असे काही बदल दिसले म्हणून लगेच हाय कोलेस्ट्रॉल आहे, असं समजू नका. कारण कोलेस्ट्रॉल वाढल्याची खात्री करण्यासाठी लिपिड प्रोफाइल रक्त तपासणी करणं आवश्यक असतं.
टीप
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.