

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लग्न ही फक्त सामाजिक परंपरा आहे, असं अनेकांना वाटतं. पण नुकत्याच समोर आलेल्या एका मोठ्या संशोधनाने या विचाराला वेगळंच वळण दिलंय. या अभ्यासानुसार, वैवाहिक आयुष्य हे केवळ नात्यांचं बंधन नसून गंभीर आजारांपासून संरक्षण देणारं एक मजबूत कवच ठरू शकतं.
अमेरिकेतील 12 राज्यांमध्ये तब्बल 40 लाखांहून अधिक प्रौढांवर एक अभ्यास करण्यात आला. 2015 ते 2022 या कालावधीत नोंदवलेल्या कॅन्सरच्या रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर धक्कादायक निष्कर्ष समोर आला.
या संशोधनातून समोर आलं की, ज्या पुरुषांचं लग्न झालं नव्हतं त्यांना विवाहित पुरुषांच्या तुलनेत कॅन्सर होण्याची शक्यता सुमारे 70 टक्क्यांनी जास्त होती. महिलांच्या बाबतीत हा धोका आणखी गंभीर असल्याचं दिसून आलं. अविवाहित महिलांमध्ये कॅन्सरचा धोका 85 टक्क्यांपर्यंत अधिक असल्याचं दिसून आलं.
या अहवालानुसार, वयाच्या 50 वर्षांनंतर हा फरक अधिक ठळकपणे दिसून येतो. यामागे अनेक वर्षांच्या सवयी कारणीभूत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. एकटं राहणाऱ्या व्यक्तींना आहाराकडे दुर्लक्ष, धूम्रपान, व्यायामाचा अभाव आणि नियमित हेल्थ चेकअप टाळण्याची सवय असते. तसंच आजाराची सुरुवातीची लक्षणं ओळखण्यात उशीर होतो, कारण त्यांच्यासोबत लक्ष देणारा कोणी नसतं. यामुळे आजाराचा धोका वाढतो.
या संशोधनात ‘ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस’ मुळे होणाऱ्या कॅन्सरवरही अभ्यास करण्यात आला. अविवाहित पुरुषांमध्ये गुदद्वाराच्या कॅन्सरचं प्रमाण विवाहित पुरुषांच्या तुलनेत पाचपट अधिक असल्याचं आढळलं. तर अविवाहित महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सरचा धोका तीनपट जास्त असल्याचं समोर आलं. तज्ज्ञांच्या मते, विवाहित लोकांमध्ये जोडीदारामुळे नियमित तपासणी, लसीकरण आणि इतर प्रतिबंधात्मक उपाय अधिक प्रमाणात केले जातात.
संशोधकांच्या मते, वैवाहिक आयुष्याचे अनेक प्रत्यक्ष फायदे आहेत. विवाहित जोडप्यांकडे साधारणपणे आर्थिक स्थैर्य अधिक असतं तसंच चांगल्या आरोग्य विम्याचीही सुविधा असते. याशिवाय पार्टनरकडून मिळणारं भावनिक पाठबळ आणि वेळेवर डॉक्टरकडे जाण्याचा आग्रह ही गोष्ट मोठ्या प्रमाणात तुमचं आरोग्य सुधारण्यात भर टाकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.