

फॅटी लिव्हरचं निदान झाल्यानंतर अनेकांना धक्का बसतो. आज जगभरात ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतायत. यामुळे यकृताशी संबंधित अनेक त्रासांचा धोका वाढू शकतो. आपल्या शरीरात यकृताचं काम खूप महत्त्वाचं आहे. शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर काढण्यास मदत करणं, आपण खाल्लेल्या अन्नातील पोषक घटकांवर प्रक्रिया करणं, आवश्यक प्रोटीन तयार करणं, ऊर्जा साठवून ठेवणं आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करणं अशी अनेक कामं यकृत करतं.
यकृत निरोगी ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. काही फळे यासाठी इतर फळांच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरू शकतात. हार्वर्डमध्ये प्रशिक्षण घेतलेले गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये फॅटी लिव्हरसाठी उपयुक्त ठरू शकणारी फळं सांगितली आहेत.
फॅटी लिव्हर असलेल्या व्यक्तींसाठी सफरचंद हा चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामध्ये पेक्टिन नावाचं सोल्युबल फायबर असतं. याशिवाय सफरचंदात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ते रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करू शकते.
ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांना दिवसातून दोन कीवी खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शक्य असल्यास कीवी सालासह खाल्ल्याने अधिक फायबर मिळू शकतं. कीवीमध्ये व्हिटॅमिन सी, आहारातील तंतू आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.
रास्पबेरीमध्ये इतर अनेक फळांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात फायबर असतं. त्यामध्ये साखरेचं प्रमाण तुलनेने कमी असून पॉलीफेनॉल्स नावाचं अँटीऑक्सिडंट्सही भरपूर असतात. रास्पबेरी साध्या ओटमीलसोबत किंवा ग्रीक योगर्टमध्ये घालून खाता येऊ शकतात.
ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे शरीरातील सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करू शकतात. ब्लूबेरी ताजी किंवा गोठवलेली अशा दोन्ही प्रकारे खाता येतं.
पेर चविष्ट तर असून आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतं. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि त्यामध्ये फायबर तसंच अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण चांगलं असते. अधिक फायबर मिळवण्यासाठी नाशपाती सालासह खाणं योग्य ठरू शकतं.
अॅव्होकॅडोमध्ये भरपूर फायबर आणि शरीरासाठी उपयुक्त मोनोअनसॅच्युरेटेड म्हणजेच चांगल्या प्रकारचे फॅट्स असतात. मसाला घालून मॅश केलेले अॅव्होकॅडो टोस्टसोबत खाता येतं. मात्र त्याचं प्रमाण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. संतुलित आहाराचा एक भाग म्हणूनच अॅव्होकॅडोचा आहारात समावेश करावा.
डाळिंबामध्ये पुनिकॅलॅजिन्स आणि एलॅजिक अॅसिड यांसारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक यकृतातील सूज कमी करण्यास, वाढलेली लिव्हर एन्झाइम्सची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. डाळिंबाचे दाणे योगर्ट किंवा सॅलडवर घालूनही खाता येतात.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.