

यंदा गणेशोत्सव सप्टेंबर महिन्यात आला आहे. आनंदाची बातमी म्हणजे हरितालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी हे दोन्ही सण सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी एकाच दिवशी येणार आहेत. त्यामुळे हरितालिका व्रत कधी करायचं, गणपतीची स्थापना कोणत्या वेळी करायची आणि उपवास कधी सोडायचा, याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे.
पंचांगानुसार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजून ६ ते ७ मिनिटांच्या सुमारास भाद्रपद शुद्ध तृतीया समाप्त होऊन चतुर्थी सुरू होणार आहे. हरितालिका व्रतासाठी सूर्योदयाच्या वेळी तृतीया असणे महत्त्वाचे असते, तर गणेश चतुर्थीसाठी चतुर्थी तिथी मध्यान्हकाळात असणे महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे यंदा दोन्ही व्रतांचा योग एकाच दिवशी आला आहे.
हरितालिका पूजनासाठी पहाटेपासून दुपारपर्यंतचा काळ योग्य माला जाणार आहे. तृतीया सकाळ ७ वाजून ६ ते ७ मिनिटांनी संपत असली, तरी त्याआधीच पूजा करणे बंधनकारक नाही. व्रताच्या नियमानुसार सकाळपासून दुपारपर्यंत हरितालिका पूजन करता येईल.
यानंतर गणपतीची स्थापना मध्यान्हकाळात तुम्ही करू शकता. पंचांगानुसार १४ सप्टेंबर रोजी गणेश पूजनासाठी सकाळी ११ ते दुपारी १.४० हा कालावधी दिला आहे. मात्र हरितालिका आणि गणेश पूजन एकाच वेळी न करता, एक पूजा पूर्ण झाल्यानंतर दुसरी पूजा करणं योग्य ठरेल.
हरितालिका व्रताचा उपवास १४ सप्टेंबरला दिवसभर करायचा असून, १५ सप्टेंबर रोजी सकाळी उत्तरपूजा करून विसर्जनानंतर उपवास सोडू शकता. काही महिला याच दिवशी ऋषी पंचमीचंही व्रत करतात. अशावेळी हरितालिका व्रताचे पारणे करून पुढे ऋषी पंचमीचा उपवास करण्याची पद्धत सांगितली जाते.
यापूर्वीही २००६ आणि २००९ मध्ये हरितालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्या होत्या. त्यामुळे यंदा दोन्ही पूजा एकाच दिवशी असल्याने संभ्रम न करता, आपल्या परंपरा आणि पंचांगानुसार दोन्ही व्रते विधीपूर्वक करता येतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.