

आजकाल पुरुष आणि महिलांमध्ये प्रजननक्षमतेशी संबंधित अडचणींचं प्रमाण वाढताना दिसतंय. असं असलं तरी अनेक कपल्स योग्य वेळी टेस्ट करून घेत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, विशेषतः नोकरी करणाऱ्या जोडप्यांमध्ये जागरूकतेचा अभाव आणि बिझी शेड्यूलमुळे या टेस्ट पुढे ढकलल्या जातात. अंदाजे ६० टक्के नोकरी करणारी जोडपं प्रजनन आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात. यामुळे भविष्यात गर्भधारणेसंबंधी समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.
प्रजननाशी संबंधित समस्या या फक्त महिलांपुरत्या मर्यादित नसून पुरुष आणि महिला दोघांनाही होऊ शकतात. महिलांमध्ये पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिं्ड्रोम (PCOS), एंडोमेट्रिओसिस, थायरॉईडच्या समस्या, ओव्हरीमधील अंड्यांची संख्या कमी असणं किंवा अंड्यांची गुणवत्ता घटणं अशा तक्रारी आढळतात.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, या पैकी अनेक समस्या सुरुवातीला कोणतीही ठोस लक्षणं न दाखवता हळूहळू वाढतात. काही प्रकरणांत मासिक पाळी अनियमित होणं, ओटीपोटात दुखणं, हार्मोन्सचं असंतुलन अशी लक्षणं दिसून येतात. पण अनेक महिलांना बराच काळ कोणतीही जाणीव होत नाही.
पुरुषांमध्येही Reproductivity मध्ये अडथळे दिसून येतात. शुक्राणूंची संख्या कमी असणं, हालचाल कमी असणं किंवा हार्मोनल बदल या कारणांमुळे गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात. बहुतेक वेळा गर्भधारणा न झाल्यानंतरच तपासणीचा विचार केला जातो. तज्ज्ञांच्या मते, हीच सर्वात मोठी चूक ठरते आणि त्यामुळे तपासणी वेळेवर करणं अत्यंत आवश्यक आहे.
मुंबईतील Apollo Diagnostics मधील रिजनल टेक्निकल हेड डॉ. उपासना गर्ग यांच्या मते, प्रजनन तपासणी ही केवळ समस्या निर्माण झाल्यावर करण्याची गोष्ट नाही. तर ती नियोजित आरोग्य तपासणीचा भाग असावी. महिलांमध्ये ओव्हुलेशन ट्रॅकिंग करून अंड्यांची निर्मिती आणि त्यांचं फुटणं नियमितपणे होतंय का हे पाहिलं जातं. हार्मोन तपासण्यांमध्ये AMH, FSH, LH, प्रोलॅक्टिन आणि थायरॉईड प्रोफाइल यांचा समावेश असतो, ज्यामुळे अंडाशयाची क्षमता आणि अंड्यांची गुणवत्ता समजण्यास मदत होते.
डॉ. गर्ग पुढे म्हणाल्या की, अल्ट्रासाऊंड तपासणीद्वारे गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये काही अडथळे आहेत का हेही तपासण्यात येतं. पुरुषांसाठी वीर्य विश्लेषण चाचणीद्वारे शुक्राणूंची संख्या, हालचाल आणि रचना तपासली जाते. या सर्व तपासण्या लवकर निदानासाठी उपयुक्त ठरतात.
२५ ते ३७ वयोगटातील सुमारे १० पैकी ६ नोकरी करणारी जोडपी तपासणी उशिरा करतात. यापैकी जवळपास ४० टक्के जोडप्यांमध्ये वंध्यत्वाशी संबंधित समस्या असू शकतात. अशा परिस्थितीत आयव्हीएफ, आयसीएसआय किंवा आययूआय यांसारख्या सहाय्यक प्रजनन उपचारांची गरज लागू शकते. वेळेवर तपासणी केल्यास नैसर्गिक गर्भधारणेची संधी वाढते आणि मानसिक तणावही कमी होतो.
मुंबईतील Zynova Shalby Hospital मधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. परिक्षीत टंक यांच्या मते, अनेक नोकरी करणाऱ्या जोडप्यांना प्रजनन आरोग्याविषयी पुरेशी माहिती नसते. धावपळीच्या जीवनशैलीमुळे तपासणी पुढे ढकलली जाते. पण वय आणि जीवनशैलीचे परिणाम प्रजननक्षमतेवर थेट होत असतात. हार्मोन चाचण्या, अल्ट्रासाऊंड, ओव्हेरियन रिझर्व तपासणी आणि वीर्य विश्लेषण या मूलभूत तपासण्या वेळेत केल्यास समस्या लवकर लक्षात येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.