

आजच्या धावपळीच्या जीवनात जंक फूड, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. मात्र त्याचवेळी शरीराला आवश्यक असलेला व्यायाम किंवा शारीरिक हालचाल फारच कमी होते. याचा परिणाम फक्त वजनावर होत नाही, तर लठ्ठपणा, फॅटी लिव्हर, किडनीशी संबंधित समस्या, मधुमेह आणि हार्ट अटॅकचा धोका देखील वाढतो.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहाराकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी फार महागड्या किंवा वेगळ्या पदार्थांची गरजच असते असं नाही. आपल्या घरच्या स्वयंपाकघरात असलेला एक साधा पदार्थही यासाठी उपयोगी ठरू शकतो.
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ओट्स आणि कोलेस्ट्रॉल याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या अभ्यासानुसार, काही विशिष्ट पद्धतीने फक्त दोन दिवस ओटमीलचा आहार घेतल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी होण्यास मदत होऊ शकते.
जर्मनीतील युनिव्हर्सिटी ऑफ बॉन येथील संशोधकांनी हा अभ्यास केला. यामध्ये 32 महिला आणि पुरुषांचा समावेश होता. या सर्वांमध्ये मेटाबॉलिक सिंड्रोमची समस्या होती. अभ्यासात सहभागी लोकांनी दोन दिवस ओटमीलवर आधारित आहार घेतल्यानंतर त्यांच्या LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलमध्ये जवळपास 10 टक्क्यांची घट दिसून आली.
विशेष म्हणजे हा परिणाम केवळ दोन दिवसांपुरता मर्यादित राहिला नाही. सहभागी व्यक्ती पुन्हा त्यांच्या नेहमीच्या आहाराकडे वळल्यानंतरही सुमारे सहा आठवड्यांनंतर या परिणामाचा काही भाग कायम राहिला, असं अभ्यासात दिसून आलं.
मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे शरीरात एकाच वेळी अनेक आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होण्याची स्थिती. यामुळे पुढे हार्ट अटॅक, मधुमेह, स्ट्रोक आणि रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचण्यासारख्या म्हणजेच एथेरोस्क्लेरोसिसच्या समस्या होण्याचा धोका वाढतो.
जास्त वजन किंवा लठ्ठपणा
उच्च रक्तदाब
रक्तातील साखर वाढणं
कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणं
संशोधकांनी सहभागी व्यक्तींना दोन गटांमध्ये विभागलं. पहिल्या गटातील लोकांना सलग दोन दिवस दिवसातून तीन वेळा फक्त ओटमील खाण्यास सांगण्यात आलं. ओट्स पाण्यात शिजवले जात होते. त्यामध्ये थोड्या प्रमाणात फळं किंवा भाज्या घेण्याची परवानगी होती. या लोकांनी दिवसाला जवळपास 300 ग्रॅम ओट्स खाल्ले. त्यांचा रोजचा कॅलरीचा आहारही नेहमीच्या तुलनेत जवळपास निम्मा करण्यात आला होता.
दुसऱ्या गटातील लोकांच्याही आहारातील कॅलरी कमी करण्यात आल्या. मात्र त्यांना ओट्स देण्यात आले नाहीत. कॅलरी कमी केल्यामुळे दोन्ही गटांना काही फायदा झाला. मात्र ओट्स खाणाऱ्या गटामध्ये हा परिणाम तुलनेने अधिक स्पष्ट दिसून आला.
अभ्यासातील ओटमील खाणाऱ्या गटामध्ये काही महत्त्वाचे बदल दिसून आले.
खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL जवळपास 10 टक्क्यांनी कमी झालं
सरासरी 2 किलो वजन कमी झालं
ब्लड प्रेशरमध्येही थोडी घट दिसून आली
मात्र याचा अर्थ असा नाही की ओट्स खाल्ल्याने औषधांची गरज संपते. डॉक्टरांच्या मते, या आहाराचा परिणाम औषधांइतका प्रभावी नसला तरी हा एक सुरक्षित आणि नैसर्गिक पर्याय ठरू शकतो.
ओट्स खाल्ल्यानंतर त्याचा परिणाम फक्त पोटावर होत नाही तर आपल्या आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांवरही होतो. संशोधनानुसार, ओटमीलमुळे आतड्यांमधील काही चांगले बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. हे बॅक्टेरिया ओट्समधील घटकांवर प्रक्रिया करून काही विशिष्ट पदार्थ तयार करतात. या पदार्थांमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.
या अभ्यासातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओट्सचं प्रमाण आणि ते किती दिवस खाल्ले गेले याचा परिणाम दिसून आला. संशोधकांना असं आढळलं की, अभ्यासात करण्यात आलेली दोन दिवसांची ओटमील डाएट पद्धत अधिक प्रभावी ठरली.
संशोधकांच्या मते, दर सहा आठवड्यांनी दोन दिवस अशा प्रकारची ओटमील डाएट केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. यामुळे पुढे मधुमेहाचा धोका कमी करण्यासही मदत होण्याची शक्यता आहे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.