दोन आरोपींचा सहभाग उघड; २२ बँक खात्यांवर देशभरातील ४२ तक्रारी
तब्बल ७.४२ कोटींच्या फसवणुकीचा उलगडा
ऑनलाइन टास्क पूर्ण करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीला बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या म्युल अकाउंट रॅकेटचा खार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून, त्यापैकी अविनाश बाबासाहेब खरात याला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपींच्या नावावर असलेल्या तब्बल २२ बँक खात्यांचा शोध लागला असून, या खात्यांशी संबंधित देशभरातील ४२ सायबर फसवणुकीच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या तक्रारींमधील फसवणुकीची रक्कम तब्बल ७ कोटी ४२ लाख २८ हजार ४०९ रुपये असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
खार पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १८३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील ६६(क), ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील फिर्यादीशी आरोपींनी टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क साधला. ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून फिर्यादीला विविध टप्प्यांमध्ये पैसे गुंतवण्यास सांगण्यात आले. त्यानुसार फिर्यादीने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ४ लाख ७ हजार ७६४ रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर कोणताही परतावा न देता फिर्यादीची फसवणूक करण्यात आली.गुन्ह्याचा तपास करताना खार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला. तसेच भारत सरकारच्या सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० आणि सायबर समन्वय पोर्टलवरील उपलब्ध माहितीचे विश्लेषण करण्यात आले. या तपासातून अविनाश बाबासाहेब खरात आणि विकास गजानन भुजबळ यांचा या प्रकरणातील सहभाग निष्पन्न झाला. त्यानंतर अविनाश खरात याला अटक करण्यात आली.
आरोपींची चौकशी केली असता त्यांनी स्वतःच्या तसेच इतर व्यक्तींच्या नावाने विविध बँकांमध्ये खाती उघडून ती सायबर फसवणूक करणाऱ्या व्यक्तींना वापरण्यासाठी उपलब्ध करून दिल्याची माहिती तपासात समोर आली. आरोपी अविनाश खरात यांच्या नावावर १३, तर विकास भुजबळ यांच्या नावावर ९, अशी एकूण २२ बँक खाती पोलिसांच्या तपासात आढळून आली.
या खात्यांची सायबर समन्वय पोर्टलवर पडताळणी केली असता देशभरातील ४२ तक्रारींमध्ये या खात्यांचा संबंध असल्याचे समोर आले. या तक्रारींमध्ये सुमारे ७.४२ कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. आरोपींच्या विविध बँक खात्यांमधून फसवणुकीच्या रकमेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, तसेच फसवणुकीची रक्कम कोणाकडे वळवण्यात आली, याचा तपास खार पोलिसांकडून सुरू आहे. बँक खात्यांतील व्यवहार, लाभार्थी, पैसे काढण्याची पद्धत आणि या खात्यांचा वापर करणाऱ्या मुख्य सायबर गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे.
या कारवाईत वपोनि संतोष काटे, पोनि दिपाली मरळे, पोउपनि विजय सैद, पोउपनि गोविंद बेडके, पोह नागेश पाटील, पोशि रुपाली मोटे आणि पोशि गणेश लोटे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
खार पोलिसांच्या तपासामुळे केवळ एका नागरिकाच्या फसवणुकीचा तपास न राहता, देशभरातील अनेक सायबर फसवणुकींशी संबंधित असलेल्या म्युल अकाउंटच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.