

पैसा कोणाला नकोय, आपल्यातील प्रत्येकाला पैसा हवाय. मात्र हीच पैशाची गरज पाहता सायबर गुन्हेगार दुप्पट परतावा देण्याचं आमिष देत आपल्यातील अनेकांना गंडा घालत आहेत. असेच प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडून दिली आहे. कमी कालावधीत पैसे दुप्पट करून देण्याचे आकर्षक आमिष दाखवून 500 हून अधिक जणांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. दरम्यान याप्रकरणातील संशयित आरोपी अटकेत असून त्याच्या सुनावणीवर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिलाय.
मुंबई सत्र न्यायालयाने मुख्य संशयित आरोपी अंकित दीपक जैन, ओंकार सिंह आणि हेतुल रांका यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आता तपास यंत्रणेचा मार्ग मोकळा झाला आहे. फसवणुकीच्या पैशांचा नेमका कुठे वापर झाला, याचा शोध घेण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे.
या प्रकरणी एफआयआर मुंबई CDB CID क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलमध्ये दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध विविध कलमांसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (MPID Act), १९९९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी नागरिकांना "कमी कालावधीत दुप्पट किंवा मोठा परतावा" मिळेल असे सांगून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सांगितलं. गुंतवणूक सुरक्षित असल्याचे वारंवार सांगण्यात आले. अनेकांनी आपल्या आयुष्यभराची बचत, निवृत्तीचे पैसे, पीएफ, ग्रॅच्युइटी, एफडी मोडून, तर काहींनी कर्ज काढून या योजनेत पैसे गुंतवले होते. पण ठरलेल्या मुदतीनंतर ना मूळ रक्कम परत मिळाली, ना आश्वासनाप्रमाणे परतावा मिळाला. त्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
तक्रारदारांच्या वतीने बाजू मांडणारे वकील निमेष आर. मेहता यांनी न्यायालयात हा शेकडो गुंतवणूकदारांच्या आयुष्यभराच्या कष्टाच्या पैशांशी संबंधित गंभीर आर्थिक गुन्हा असल्याचे सांगत जामीन अर्जास तीव्र विरोध केला. तपास अद्याप सुरू असून संपूर्ण आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेणे बाकी असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणलं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि तपासातील कागदपत्रांचा विचार केल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.