

देशात स्वच्छ आणि पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा वापर वाढवल्यानंतर आता स्वयंपाकासाठी सुद्धा इथेनॉलचा वापर करण्याची योजना सरकार आखत असल्याची माहिती समोर आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय यासाठी नवीन धोरण तयार करत असून, त्यामध्ये इथेनॉलवर चालणाऱ्या चुलींना प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी देण्याचाही विचार केला जात आहे.
इथेनॉल हे ऊस, धान्य आणि इतर साखरयुक्त पिकांच्या प्रक्रियेतून तयार होणारं जैवइंधन आहे. भारतात इथेनॉल उत्पादन क्षमतेत मोठी वाढ झाली असून, वार्षिक उत्पादन क्षमता २० अब्ज लिटपरेक्षा जास्त झाली आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात आणखी ४ अब्ज लिटर उत्पादन क्षमता वाढवण्याची अपेक्षा आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होत असला, तरीही देशात मोठ्या प्रमाणात इथेनॉल शिल्लक राहत असल्याचं सांगितलं जात आहे.
याच जास्त उत्पादनाचा वापर घरगुती स्वयंपाकासाठी करण्याचा सरकारचा विचार आहे. यासाठी तेल विपणन कंपन्यांकडून एथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे संशोधन आणि चाचण्या सुरू असल्याची माहिती आहे. भविष्यात पेट्रोल पंपांवर विशेष "एथेनॉल एटीएम" उभारून नागरिकांना गॅलनमध्ये एथेनॉल उपलब्ध करून देण्याची संकल्पनाही चर्चेत आहे.
तज्ज्ञांच्या मते, एथेनॉलचा वापर वाढल्यावर LPGची आयात कमी व्हायला मदत होईल आणि देशाची ऊर्जा सुरक्षितताही मजबूत होईल. पण सरकारने अद्याप या प्रस्तावावर अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे अंतिम धोरण जाहीर झाल्यानंतरच सबसिडी, अंमलबजावणी आणि वापराच्या नियमांबाबत स्पष्ट माहिती मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.