Woman Hit By Bus: यवतमाळ शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडलेली आहे. परिजात सोसायटीतील 65 वर्षीय ताई देवसिंग चव्हाण यांचा एसटी बसखाली सापडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यवतमाळ ते पुलगाव ही धावणारी एसटी बस मागून आल्यानंतर चव्हाण यांना धडक देत पुढे गेली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने नागपूर येथे हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
बस स्थानकावरील संपूर्ण घटनेचा व्हिडिओ जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओमध्ये(Video) स्पष्टपणे दिसते की, ताई देवसिंग चव्हाण या बस स्थानकाजवळून चालत जात असताना मागून येणाऱ्या एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेनंतर त्या रस्त्यावर कोसळल्या आणि बस त्यांच्यावरून गेल्याचंही काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
अपघात(Accident) घडताच घटनास्थळी नागरिकांची आणि प्रवाशांची मोठी गर्दी झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ अॅम्ब्युलन्स बोलावली आणि गंभीर जखमी अवस्थेत ताई चव्हाण यांना तातडीने नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर जीव वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या अंगावरून बस गेल्यामुळे झालेल्या गंभीर आंतरविक दुखापतीमुळे त्यांना वाचवता आलं नाही. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केलं.
या घटनेमुळे यवतमाळ बस स्थानकातील सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शिवाय एसटी बसेसच्या अनियमित आणि बेफिकीर वाहन चालवण्यामुळे अशा घटना घडतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे. बस स्थानकात वर्दळ अधिक असताना वाहतूक व्यवस्थापन अधिक काटेकोर आणि नियमबद्ध असायला हवे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
टीप: बस स्थानकावरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.