मुंबई क्रिकेट असोसिएशनने क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी घोषणा केलीये. टी-२० मुंबई लीगचा चौथा सिझन पुन्हा सुरू होत असून त्यासोबतच प्रथमच टी-२० मुंबई महिला लीगही सुरू करण्यात येणार आहे.
दोन्ही स्पर्धांच्या ट्रॉफींचं अनावरण भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्माच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं. या सोहळ्यात मुंबईची खेळाडू आणि भारतीय संघातील सदस्य सायली सतघरे, एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक, राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि माजी एमसीए अध्यक्ष आशिष शेलार तसंच लीग गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष राजदीप गुप्ता उपस्थित होते.
या वेळी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “मुंबईतील क्रिकेटची प्रगती पाहून मला खूप आनंद होतोय. केवळ आयपीएलमधील मुंबई टीमच नव्हे तर टी-२० मुंबई लीगमुळे अनेक तरुण खेळाडूंना मोठी संधी मिळालीये. या स्पर्धेत खेळलेले अनेक क्रिकेटपटू पुढे आयपीएलमध्ये आणि भारतीय संघातही पोहोचले. त्यामुळे ही लीग तरुणांसाठी खूप मोठा मंच आहे. गेल्या सिझनमध्ये मीही सहभागी होतो. यंदा महिलांचे तीन टीमही सहभागी होणार असल्याने स्पर्धा अधिक मोठी होत आहे.”
महिला लीगच्या महत्त्वाबाबत सांगताना सयाली सतघरे म्हणाली, “मुंबई हे क्रिकेटवर प्रेम करणारं शहर आहे. आता महिलांसाठीही स्वतंत्र व्यासपीठ तयार होताना दिसतंय. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. महिला क्रिकेटच्या भविष्यासाठी अशी संधी निर्माण केल्याबद्दल मी एमसीएचे आभार मानते. या स्पर्धेमुळे अनेक तरुण मुलींना मोठे स्वप्न पाहण्याची आणि उच्च पातळीवर खेळण्याची प्रेरणा मिळेल.”
एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितलं, “मुंबईच्या क्रिकेटची परंपरा ही नेहमीच मजबूत पायाभूत रचनेवर उभी राहिलीये. खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची आणि पुढे जाण्याची प्रेरणा याठिकाणाहून मिळते. टी-२० मुंबई लीग ही त्याच विचारातून सुरू करण्यात आली. शहरातील प्रतिभावान क्रिकेटपटूंना व्यावसायिक मंच देणं हा या स्पर्धेचा उद्देश आहे. त्यात आता महिला लीगची भर पडतेय.”
माजी एमसीए अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री आशिष शेलार म्हणाले, “२०१८ साली ही लीग सुरू करताना आपल्याला तरुण खेळाडूंना मोठ्या पातळीवर संधी द्यायची होती. आज त्या कल्पनेचा परिणाम आपल्यासमोर दिसत आहे. फ्रँचायझी मालकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दलही मी त्यांचे स्वागत करतो. महाराष्ट्र सरकार आणि मी स्वतः या स्पर्धेसाठी नेहमीच सहकार्य करू. महिलांचे तीन संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.”
पुरुषांच्या स्पर्धेच्या चौथ्या सिझनमध्ये शहरातील विविध भागांचं प्रतिनिधित्व करणारे आठ संघ पुन्हा मैदानात उतरणार आहेत. त्यामध्ये Aakash Tigers Mumbai Western Suburbs, ARCS Andheri, Bandra Blasters, Eagle Thane Strikers, Mumbai South Central Maratha Royals, North Mumbai Panthers, SoBo Mumbai Falcons आणि Triumph Knights Mumbai North East या टीमचा समावेश आहे.
२०१८ साली सुरू झाल्यापासून टी-२० मुंबई लीग भारतातील स्पर्धात्मक स्थानिक टी-२० स्पर्धांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत खेळलेले अनेक क्रिकेटपटू पुढे मुंबई आणि भारतासाठी खेळलेत. त्यात शिवम दुबे आणि तुषार देशपांडे यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.