u mumba saam tv
क्रीडा

PKL 2024: यु मुम्बाच्या विजयाची हॅट्रिक! युपी योद्धाजचा २ गुणांनी पराभव

U Mumba vs UP Yoddhas: यु मुम्बा आणि युपी योद्धाज यांच्यात झालेल्या सामन्यात यु मुम्बाने शानदार विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

प्रो कबड्डीच्या ११व्या पर्वात सर्वोत्तम राखीव खेळाडू (सुपर सब) म्हणून नावारुपाला आलेल्या रोहित राघवने दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात आपला लौकिक राखला. निर्णायक क्षणी रोहितने मिळवलेल्या तीन गुणांच्या जोरावर यु मुम्बाने रविवारी (१० नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात युपी योद्धाजचा ३५-३३ असा पराभव केला.

रोहित राघवचे आठ गुण आणि कर्णधार सुनिल कुमारचे बचावातील ४ गुण यु मुम्बासाठी निर्णायक ठरले. यु मुम्बाने सलग तिसऱ्या विजयाची नोंद करत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळविले.

घरच्या मैदानावर युपी योद्धाजने झकास सुरुवात केली होती. पण, त्यांना यु मुम्बाच्या सुनिल कुमारची बचावाची भिंत भेदता आली नाही. मध्यंतराच्या एका गुणाच्या पिछाडीनंतरही उत्तरार्धात कमालीचा वेगवान खेळ करणाऱ्या यु मुम्बा संघाने सर्वोत्तम सांघिक कामगिरीचे प्रदर्शन करताना सुरेख विजयाची नोंद केली.

सनिल कुमारच्या अव्वल पकडी निर्णायक ठरत असताना सामन्यात प्रत्येकवेळेस राखीव खेळाडू म्हणून उतरल्यावर गुण मिळविणाऱ्या रोहित राघवच्या चढाया त्यांच्या विजयात निर्णायक ठरल्या. झफरदानेश आणि अजित चौहान या त्यांच्या नियमित चढाईपटूंनी अनुक्रमे ३ आणि ८ गुणांची त्यांना पूरक साथ केली.

युपी योद्धाजने भरत हुडाच्या (११) सुपर टेनच्या जोरावर प्रतिकार केला असला, तरी त्यांना सुरेंदर गिलची अनुपस्थिती निश्चित जाणवली. शिवम चौधरीने ५ गुण मिळवत जरुर चांगला प्रयत्न केला. पण, तो पुरेसा ठरला नाही. दोन्ही संघांनी एकमेकांवर चढवलेले दोन लोण सामन्यातील रंगत स्पष्ट करणारे ठरले. त्यातही यु मुम्बाने अखेरच्या मिनिटात चढवलेला लोण निर्णायक ठरला.

मध्यंतराला १६-१७ अशा एका गुणाने पिछाडीवर राहिल्यानंतर उत्तरार्धातही यु मुम्बाने आपला जोशपूर्ण खेळ कायम ठेवला. झफदानेश, अजित चौहान सावध चढाया करत असतानाच सुनिल कुमारने सामन्यातील दुसरी अव्वल पकड करताना गगन गौडाला पकडले. त्यानंतर परवेस भैन्सवालच्या साथीत शिवमची अव्वल पकड करुन यु मुम्बाचे आव्हान राखले होते. पूर्वार्धात धाडकेबाज सुरुवात करणारे युपी योद्धाज संघाचे शिवम चौधरी आणि भरत हुडा चढाईपटू उत्तरार्धात चमक दाखवू शकले नाहीत.

उत्तरार्धात आघाडी कायम राखताना अनेक वेळ यु मुम्बा दोन खेळाडूतच खेळत होते. दोन वेळा अव्वल पकड करणारे यु मुम्बाचे बचावपटू या वेळी अपयशी ठरले. राखीव खेळाडू केशव कुमारने परवेझला बाद केले आणि नंतर सुमितने सुनिल कुमारची पकड घेत युपी योद्धाजने सामन्यात दुसऱ्यांदा यु मुम्बावर लोण देत पुन्हा एकदा २६-२३ अशी आघाडी मिळवली.

या दुसऱ्या लोणच्या संधीनंतर युपी योद्धाजने सामन्यावर नियंत्रण राखत आघाडी आपल्याकडे राखली होती. सामन्याची दीड मिनिट शिल्लक असताना मुम्बा संघाने रोहित राघवला मैदानात उतरविण्याची चाल खेळली आणि रोहितने ती योग्य ठरवत एकाच चढाईत दोन गुण टिपत संघाची पिछाडी ३०-३१ अशी कमी केली.

रोहितच्या पाठोपाठच्या चढाईत आणखी एका गुणाची वसूली करताना ३१-३१ अशी बरोबरी आणली आणि त्यानंतर अखेरच्या मिनिटांत पुन्हा एकदा लोण परतवून लावत युपी योद्धाजवर अखेरच्या चढाईला ३४-३३ आघाडी मिळवली. संपूर्ण सामन्यात एका अव्वल पकडीवरच समाधान मानावे लागलेल्या परवेझने अखेरच्या चढाईला शिवम चौधरीची पकड करुन यु मुम्बाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

त्यापूर्वी, पूर्वार्धात घरच्या मैदानावर पहिला सामना खेळताना युपी योद्धाज संघाने जोरदार सुरुवात केली. नियोजित कर्णधार सुरेंदर गिल संघात नसतानाही युपी योद्धाजने पहिल्या सहा मिनिटांत यु मुम्बावर लोणची नामुष्की आणली होती. यु मुम्बाला लोण स्विकारे पर्यंत गुणांचे खाते उघडता आले नव्हते. सामन्याच्या पहिल्या सहा मिनिटांत युपी योद्धाजने ९-१ असे निर्विवाद वर्चस्व राखले होते.

शिवम चौधरी आणि भरत हुडाचा खेळ त्यांच्यासाठी निर्णायक ठरला होता. लोण स्विकारावा लागल्यावर डिवचल्या गेलेल्या यु मुम्बाने जोरदार सामन्यात पुनरागमन करताना पुढील पाच मिनिटांत युपी योद्धाजवर लोण चढवत १२-११ अशा स्थितीत सामना आणला. झफरदानेश आणि अजित चौहानच्या चढाया, तर सुनिल कुमारने केलेली भरतची अव्वल पकड यात निर्णायक ठरली होती. रिंकूनेही त्याला दोन पकडी करत साथ केली. पूर्वार्धातील पहिल्या दहा मिनिटांत १०-५ असे मागे राहिलेल्या यु मुम्बाने पुढच्या १० मिनिटांत ११ गुणांची कमाई करताना मध्यंतराला सामना १७-१६ असा रंगतदार स्थितीत आणला होता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 3rd T20I: पहिल्याच बॉलवर Ramandeep Singhने रचला इतिहास! ठरला दुसराच भारतीय फलंदाज

Health Tip: टेंशन कमी करण्याचे 'हे' आहेत उपाय

Maharashtra News Live Updates :नागपूर - सुरत महामार्गावर भीषण अपघात

BEL Recruitment: इंजिनियर झालात? भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरी; मिळणार १,६०,००० रुपये पगार; अशा पद्धतीने करा अर्ज

Mumbai Crime: तरुणी नव्हे तर तरुणाचा मृतदेह, गोराई बिचवरच्या हत्येचं गूढ उकललं, टॅट्यूवरून असा झाला उलगडा

SCROLL FOR NEXT