प्रो कबड्डी लीग स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेत रविवारी (३ नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात यु मुंबा आणि पुणेरी पलटण हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या रोमांचक सामन्यात यु मुंबाला पुणेरी पलटणकडून २८- ३५ ने पराभवाचा सामना करावा लागला आहे.
गच्चीबाऊली येथील जीएमसीबी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील आजच्या सामन्यात मुंबई व पुणे हे दोन्ही महाराष्ट्राचे संघ लढत असल्यामुळे कमालीची उत्सुकता होती. पूर्वार्धात पुणेरी संघाने २२-१६ अशी सहा गुणांची आघाडी होती. हीच आघाडी त्यांच्यासाठी निर्णायक ठरली.
नाणेफेकीचा कौल मुंबई संघाच्या बाजूने गेला. सुरुवातीपासून पुणेरी पलटण संघाने सावध पवित्रा घेत आघाडीपण घेतली. पूर्वार्धातील पाचव्या मिनिटाला त्यांच्याकडे ४-१ अशी आघाडी होती मात्र सातव्या मिनिटाला मुंबा संघाचा कर्णधार सुनील कुमार याने सुपर टॅकल करीत ५-५ अशी बरोबरी साधली पाठोपाठ सोमबीर याच्या ऐवजी आत आलेल्या रोहित राघवने एक चढाई करत दोन गुणांची कमाई केली. यासह त्याने आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर सोमबीर बाहेर गेल्यानंतर आत आलेल्या रोहितनने शानदार चढाई केली. या चढाईत त्याने २ गुणांची कमाई केली आणि संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुणेरी पलटणच्या गौरवने सुपर टॅकल केलं आणि आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली.
पूर्वार्धातील पंधराव्या मिनिटाला पुणेरी पलटण संघाने पहिला लोण चढवीत १७-१२ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. पूर्वार्ध संपेपर्यंत त्यांनी ही आघाडी कायम ठेवली. या दरम्यान मुंबई संघाच्या चव्हाण व मनजीत यांनी चढाईत प्रत्येकी दोन गडी बाद केले. मध्यंतराला पुण्याकडे २२-१६ अशी आघाडी होती.
उत्तरार्धातही सुरुवातीपासूनच पुणेरी पलटण संघाने आपली आघाडी कायम ठेवली होती २५ व्या मिनिटाला त्यांच्याकडे २६-१७ अशी आघाडी होती. मुंबा संघाच्या अजित चव्हाण याने खोलवर चढाया करीत सातत्याने गुण मिळवीत संघाची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. सामन्याच्या ३० व्या मिनिटाला पुणे संघाकडे २८-२२ अशी सहा गुणांची आघाडी होती. शेवटची आठ मिनिटे बाकी असताना पुण्याचा कर्णधार अस्लम इनामदार याने विश्रांती घेत आकाश शिंदे याला संधी दिली. सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला पुण्याकडे ३०-२४ अशी आघाडी होती.
यु मुंबा संघाकडून मनजीत व अजित चव्हाण यांनी चढाई मध्ये अनुक्रमे सहा व नऊ गुण नोंदविले तर पकडीमध्ये अमीर मोहम्मद जाफर दानिश याने चार गुण मिळविले. पुणेरी पलटण संघाकडून कर्णधार अस्लम इनामदार याने सर्वाधिक १० गुण मिळविले तर गौरव खात्री याने पकडीत ७ गुण मिळविले तर मोहित गोयत (९ गुण) यानेही खोलवर चढाया करीत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.